10 August 11:43

चाळीतील कांदा बाजारात आल्याने दरात ५०० रुपयांनी घसरण


चाळीतील कांदा बाजारात आल्याने दरात ५०० रुपयांनी घसरण

कृषिकिंग, नगर/नाशिक: नाफेडने कांदा खरेदी बंद केली, कर्नाटकातील लाल कांदा सुरू झाला. तशातच चाळीतील कांदा सडू लागल्याने आता तो विक्रीसाठी काढावा लागत आहे. त्यामुळे आता कांद्याच्या दरात मोठी घसरण सुरू झाली असून, सरासरी ८०० ते १००० रुपये क्विंटल दराने कांदा विकला जात आहे.

'नगर, पुणे, नाशिक व सोलापूर जिल्हय़ांत यावर्षी नाफेडने शेतकरी कंपन्यांमार्फत खरेदी सुरू केली होती. सुमारे २५ हजार टन कांदा खरेदी केला जाणार होता. मात्र चाळी उपलब्ध झाल्या नसल्याने खरेदी बंद करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे १२ हजार टन खरेदी नाफेडने केली आहे.' अशी माहिती नाफेडचे व्यवस्थापक बी.एम.पवार यांनी दिली आहे.

कांदा दरातील घसरण रोखण्याकरिता नाफेडमार्फत २५ हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच निर्यातीकरिता अनुदानही देण्यात येत असून, निर्यातही सुरू आहे. त्यामुळे एक महिन्यापूर्वी दरात वाढ होऊन ते १३०० ते १५०० रुपयांवर गेले होते. दरवाढ सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कमी किमतीत चाळीतील कांदा विक्रीला काढलेला नव्हता. त्यामुळे नाफेडच्या खरेदीलाही पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने खरेदी बंद पडली. आता नाफेडची खरेदी बंद होताच दरात घसरण सुरू झाली. ही घसरण पंधरा दिवसात सुमारे ५०० रुपयांनी झाली. आता कांद्याच्या दरात सुधारणा होईल, असे चित्र सध्यातरी दिसत नसल्याने शेतकऱ्यांनी नाइलाजाने कांदा विक्री सुरू केली आहे.

याशिवाय कर्नाटक व आंध्र प्रदेशात नवीन कांद्याची आवकही सुरू झाली आहे. ही आवक १५ ऑगस्टनंतर वाढेल. तसेच फलटण व लोणंद भागातील लाल कांदा १५ सप्टेंबरनंतर सुरू होईल. तसेच यंदा लाल कांद्याची विक्रमी लागवड झाली असून हा कांदा ऑक्टोबपर्यंत बाजारपेठेत येण्यास सुरुवात होईल. त्यामुळे आता चाळीत साठविलेला कांदा विक्रीला काढण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय राहिलेला नाही. सध्यस्थितीत दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आदी राज्यांतून मागणी असून, तेथील व्यापारी खरेदीसाठी आले आहेत. तरीदेखील बाजारावर जादा मालाचा दबाव असल्याने दरात वाढ झालेली नाही. आणखी मंदी येण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत.



टॅग्स