23 October 16:05

घातक कीटकनाशकांच्या पुरवठ्याला कृषी मंत्रालय जबाबदार- पवार


घातक कीटकनाशकांच्या पुरवठ्याला कृषी मंत्रालय जबाबदार- पवार

कृषिकिंग, नागपूर: विदर्भात घातक किटकनाशकांच्या वापरामुळे काही दिवसांपूर्वी अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. या प्रकरणात १०० टक्के दोष हा संबंधित मंत्रालयाचाच आहे. घातक कीटकनाशके शेतकऱ्यांपर्यंत पोहचू नये, यासाठी कठोर कायदे करण्यात आले आहेत. जर अशी कीटकनाशके शेतकऱ्यांपर्यंत पोहचत असतील तर याला केंद्रीय कृषी मंत्रालयच जबाबदार आहे.” असा स्पष्ट आरोप माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला आहे.

कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांचा मृत्यू होणे हे अत्यंत दुदैर्वी आहे. कीटकनाशकांच्या संदर्भात देशात एक कायदा आहे. त्याच्या वापरासंदर्भात एक स्वतंत्र संशोधन संस्था दिल्लीत आहे. या संस्थेची मान्यता असल्याशिवाय कुठलेही कीटकनाशक वापरता येत नाही. त्यामुळे अप्रमाणित कीटकनाशक कसे शेतकऱ्यांपर्यंत पोहचले हे कळत नाही. अशी प्रतिक्रियाही शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली आहे.

तसेच या प्रकरणात दोष हा पूर्णपणे संबंधित मंत्रालयाचा असून, मी दहा वर्ष मंत्री होतो तेव्हा हा विभाग माझ्याकडे होता. एकदाही अशी घटना झाली नाही. त्यामुळे दोषी कंपन्यांना आणि लोकांना कडक शासन केले गेले पाहिजे, अशी मागणीही पवारांनी केली आहे.

गेल्या काही दिवसात विषारी कीटकनाशकांच्या फवारणीनंतर यवतवाळमध्ये शेतकऱ्यांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाले. त्याचे लोण महाराष्ट्राच्या इतर भागातही पसरले होते. त्यामुळे आता याप्रकरणी पवारांनी केंद्राकडे बोट दाखवल्यावर काय कारवाई होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.टॅग्स