22 February 18:25

गुजरात, राजस्थानसह महाराष्ट्रातील शहरी पर्यटकांची जुन्नर द्राक्ष महोत्सवाला पसंती


गुजरात, राजस्थानसह महाराष्ट्रातील शहरी पर्यटकांची जुन्नर द्राक्ष महोत्सवाला पसंती

कृषिकिंग, मुंबई: "जुन्नर येथील गोळेगाव (लेण्याद्री) येथे नुकत्याच झालेल्या द्राक्ष महोत्सवाला गुजरात, राजस्थानसह राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, अलिबाग, औरंगाबाद आदी शहरातील सुमारे ८०० पर्यटकांनी भेट देऊन ग्रामीण आणि कृषी पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. शहरी भागातील नागरिकांना आणि विशेषत: तरुण मुले, विद्यार्थी यांना गावाकडील पर्यटनात तसेच शेती-शिवाराच्या पर्यटनात मोठा रस असून त्याचा उपयोग ग्रामीण भागाच्या पर्यटन विकासासाठी केला जाईल," असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी सांगितले आहे.

एमटीडीसीचे माळशेजघाट रिसॉर्ट आणि जुन्नर तालुक्यातील द्राक्ष शेतकरी यांच्या सहभागातून गोळेगाव (लेण्याद्री) येथे १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शहरी भागातील नागरिकांना द्राक्षांची बाग कशी असते, शेतकरी त्याचे उत्पादन कसे घेतात, द्राक्षांचे वेगवेगळे प्रकार कोणते, द्राक्षांपासून वाईनची निर्मिती कशी होते, अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याबरोबरच द्राक्षांची प्रत्यक्ष शेतात जाऊन चव चाखण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यास शहरी भागातील पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्याचेही काळे यांनी सांगितले आहे.

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी नाममात्र प्रवेश फी आकारण्यात आली. त्यातून तसेच द्राक्षांच्या विक्रीतून शेतकऱ्यांचा चांगला व्यवसाय झाला. द्राक्ष महोत्सवाप्रमाणेच आगामी काळात केळी, डाळिंब, हुरडा आणि गुळ महोत्सव आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.



टॅग्स