03 November 11:00

गारपिटीनेही न खचलेल्या शेतकऱ्याच्या यशाची कहाणी...


गारपिटीनेही न खचलेल्या शेतकऱ्याच्या यशाची कहाणी...

कृषिकिंग, नाशिक: नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात गेल्या वर्षी गारपिटीनं द्राक्षबागांचं प्रचंड नुकसान केलं. यामुळे अनेक शेतकरी खचून गेले. पण पिंपरी गावातल्या भगवान ठोंबरे या तरुण शेतकर्‍यानं द्राक्ष बाग काढून टाकली आणि संपूर्ण शेतीत भाजीपाला लावला. त्यांनी ऑगस्टमध्ये कारल्याचं पहिलं पीक घेतलं. तण व्यवस्थापनासाठी ५० हजार रुपये खर्च करून मल्चिंगचा उपयोग केला. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक घेण्यावर भर दिला.

ठिबक सिंचनातून पाणी आणि विद्राव्य खतं दिली. काही दिवसातच कारल्याचं अतिशय डौलदारपणे पीक उभं राहिले. या पहिल्या पिकातून त्यांना एक ते दिड लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला.

काढणीनंतर माल साधारण पिंपळगाव, लासलगाव, कोपरगाव, वैजापूर मार्केटला नेला जातो. कधी २०० रु. दर मिळाला कधी २५० रु. मिळाला कधी १०० रु. मिळाला आणि सध्या आता सणासुदीचे दिवस असल्याने १३० ते १३५ दर मिळतोय असे ठोंबरे सांगतात. हे दर पुढे वाढण्याचीही अशा त्यांना आहे.

या कारल्याच्या लागवडीसाठी ठोंबरे यांचा एकूण ५० हजार खर्च आला असून, त्यांना साधारण दीड लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न झाले आहे. अर्थात, शेती तोट्याची आहे, असं म्हणणार्‍या शेतकर्‍यांसाठी एक आदर्श उदाहरच ठोंबरेंनी घालून दिलं आहे.