24 February 12:59

गारपिटीचे संकट तूर्त टळले; हवामान खात्याचा इशारा मागे


गारपिटीचे संकट तूर्त टळले; हवामान खात्याचा इशारा मागे

कृषिकिंग, मुंबई: महाराष्ट्रावरील गारपिटीचे संकट तूर्त टळले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (आयएमडी) उत्तर महाराष्ट्रात शुक्रवार, शनिवारी अर्थात २३ आणि २४ फेब्रुवारीला गारपिटीचा इशारा देण्यात आला होता, तो मागे घेण्यात आला आहे. हिमालय भागातील कमी दाबाचा पट्टा क्षीण झाल्याने महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता मावळल्याचे आयएमडीने सुधारित अंदाजात म्हटले आहे.

हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात शुक्रवार, शनिवारी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा तीन-चार दिवसांपूर्वी दिला होता. मात्र आता उत्तर भारतातील पर्वतमय भागातील कमी दाबाचे क्षेत्र विरळ झाल्याने गारपिटीची शक्यता मावळली असल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे. तर राज्यातील हवामानात बदल होत असून, तापमान वाढत असल्याचे हवामान विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.