14 June 12:01

खरीप हंगामासाठी बियाणे आणि खतांची मुबलक उपलब्धता- कृषिमंत्री


खरीप हंगामासाठी बियाणे आणि खतांची मुबलक उपलब्धता- कृषिमंत्री

कृषिकिंग, मुंबई: “खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडे बियाणे आणि खतांची कोणतीही कमतरता नाही. शेतकऱ्यांना गरजेनुसार त्याची पूर्तता केली जाईल,” अशी माहिती कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच पीकविम्यासाठी नोंदणी सुरू झाली असून, शेतकऱ्यांनी त्याचा वेळेत लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतही उपस्थित होते.

कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजय कुमार तसेच कृषी विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांसोबत खरीप हंगामासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा पाटील यांनी घेतला. पीकविमा नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, शेतकऱ्यांनी जवळच्या "आपलं सरकार' केंद्रामार्फत किंवा कर्ज घेतलेल्या बॅंकांमार्फत २४ जुलैपर्यंत पीकविम्यासाठी अर्ज करावा, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले आहे.

शेतकऱ्यांनी पावसाचा अचूक अंदाज व जमिनीचा ओलावा विचारात घेऊनच पेरणीची प्रक्रिया सुरू करावी. जास्तीत जास्त आंतरपिके घेण्याला प्राधान्य द्यावे. खते आणि कीटकनाशकांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना यावेळी केले आहे.



टॅग्स