29 March 16:02

खंडाळा येथील शेतकऱ्याने औषध फवारणीविना घेतले कांद्याचे भरघोस उत्पन्न


खंडाळा येथील शेतकऱ्याने औषध फवारणीविना घेतले कांद्याचे भरघोस उत्पन्न

कृषिकिंग, औरंगाबाद: शेतीमध्ये कोणतेही उत्पन्न घ्यावयाचे असल्यास प्रथम फवारणीसाठी औषध कोणते वापरणार हा मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्यासमोर असतो. परंतु खंडाळा येथील शेतकऱ्याने कोणत्याही औषध फवारणीविना कांद्याचे भरघोस उत्पन्न घेतले आहे. कांद्याची लागवड आपल्याकडे साधारणपणे सपाट वाफा पद्धतीने अथवा सरी वरंबा पद्धतीवर केली जाते.

कांद्याची उत्पादकता कमी असण्याच्या प्रमुख कारणांमध्ये पाणी व्यवस्थापनाची अयोग्य पद्धत, सुधारित जातीचा अभाव, असंतुलित पोषण, एकरी रोपांची संख्या पीक संरक्षणाकडील दुर्लक्ष ही आहेत. त्यामुळे कांदा उत्पादनात कमी अधिक फरक आपणास बघावयास मिळतो. परंतु औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावातील शेतकरी अर्जुन रंभाजी मगर यांनी वेगळ्या पद्धतीने कांद्याचे नियोजनबद्ध उत्पन्न घेतले आहे.

अर्जुन मगर हे पारंपरिक पद्धतीने शेती करतात. त्यांची शेती गट नं. ६४१ मध्ये आहे. अनेक प्रकारची पिके कुणाचेही मार्गदर्शन न घेता वेगवेगळ्या पद्धतीने ते आपल्या शेतीत घेत असतात. त्यातील कांदा उत्पादनावर त्यानी औषध फवारणीचा वापर न करता चार वर्षांनंतर प्रथमच एकरी २५० क्विंटल उत्पन्न घेतले आहे. मगर यांनी कांदा लागवड ही रोपे गादी वाफ्यांवर तयार करून त्यांची पुनर्लागवडही सपाट वाफा पद्धतीने केली. कांदा लागवड करण्याची ही पद्धत सर्वच पारंपारिक पद्धतीने कांदा लागवड करणारे शेतकरी वापरतात. मात्र, अर्जुन मगर यांनी कोणत्याही औषध फवारणी विना घेतलेले उत्पादन हे अभूतपूर्व आहे.

साधारणतः कांद्याची रोपे सपाट वाफ्यात किंवा सरी वरंब्यावर लावली जातात. सपाट वाफ्यातील लागवड सरी वरंब्यापेक्षा जास्त फायदेशीर ठरते. कारण सपाट वाफ्यांमध्ये रोपांची संख्या सरी वरंब्यापेक्षा जास्त बसते. रोपांच्या वाढीला चांगला वाव मिळतो. पाणी सारखे बसते, खुरपणी आणि वरखतांची मात्रा देणे इत्यादी कामे सोपी होतात. लहान किंवा चिंगळी कांद्याचे प्रमाण सरी-वरंब्यावर केलेल्या कांद्याच्या तुलनेत कमी राहते. मगर यांनी सरी-वरंब्यामध्ये मध्यावर ४ बाय ६० फूट वाफा तयार केला होता. सरीच्या वरच्या भागात लावलेला कांदा चांगला पोसतो, तर तळातील कांदा लहान राहतो. त्याकरिता त्यांनी पाणी वरंब्यामध्ये साचले नाही पाहिजे अशा पद्धतीने पाण्याचे नियोजन केले होते.टॅग्स