26 November 16:30

केरळसारख्या आपत्तीच्या पूर्वानुमानासाठी आयएमडीकडून नवीन तंत्रज्ञान विकसित


केरळसारख्या आपत्तीच्या पूर्वानुमानासाठी आयएमडीकडून नवीन तंत्रज्ञान विकसित

कृषिकिंग, नवी दिल्ली: "केरळमध्ये आलेल्या महापुरासारख्या आपत्तीपासून वाचण्यासाठी भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) नवीन तंत्रज्ञान विकसित केले असून, पावसामुळे नद्या आणि धरणांच्या पाणीपातळीत झालेल्या वाढीबाबतच्या आकलनासाठी हे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. यामुळे पावसाच्या प्रभावाचे मॉनिटरिंग करण्यासाठी राज्य सरकारांना मदत होणार आहे." अशी माहिती आयएमडीचे प्रमुख के.जे.रमेश यांनी दिली आहे. सेंटर फॉर साइंस ऐंड इन्वाइरनमेंट द्वारा आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

'इम्पैक्ट बेस्ड फॉरकास्टिंग अप्रोच' असे या तंत्रज्ञानाचे नाव असून, ते अतिवृष्टी, महापूर आणि अन्य नैसर्गिक आपत्तीची आगाऊ माहिती देणार आहे. यामुळे प्रशासनाला आपत्ती निवारणासाठी पूर्वकल्पना मिळणार आहे. पाऊस आल्यास पुढे काय होणार? याची माहिती होणे खूप गरजेचे असते. अशा स्थितीत जलाशयांमधून पाणी सोडायचे कि नाही? यांसारखे निर्णय घेण्यास प्रशासनाला मदत होणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात केरळमध्ये आलेल्या महापुरामुळे ५०० पॆक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर या महापुरात ४० हजार कोटींपेक्षा अधिकचे आर्थिक नुकसान झाले होते.

केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन यांनी विधासभेत माहिती देताना सांगितले होते की, "हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात चूक झाली होती. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत केरळमध्ये ९८.५ मिमी होण्याचा अंदाज होता. मात्र या कालावधीत केरळमध्ये विक्रमी ३५२.२ मिमी पावसाची नोंद झाली होती."