29 March 10:19

केंद्र सरकार नाफेडमार्फत २५ हजार टन कांदा खरेदी करणार


केंद्र सरकार नाफेडमार्फत २५ हजार टन कांदा खरेदी करणार

कृषिकिंग, (लासलगाव)नाशिक: “कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाव स्थिरीकरण योजनेतून २५ हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार चढ्ढा यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत व लासलगाव बाजार समितीत कांद्याची खरेदी केली जाणार असल्याने भाव स्थिर राहण्यास मदत होणार आहे. बुधवारी अर्थात काल नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सुमारे ३२ हजार ९२० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर क्विंटलचा सरासरी भाव ६०० रुपये होता. कांद्याचे चांगले उत्पादन झाल्याने आवक वाढली असून, दरात सातत्याने घसरण होत आहे.

ऑगस्ट ते डिसेंबर या काळात सरासरी २ हजार रुपये असलेला कांदा आता घाऊक बाजारात क्विंटलमागे ६०० ते ७०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. नाफेडने किमान १५ हजार टन कांदा खरेदी करावा, अशा मागणीचे पत्र शेतकऱ्यांच्या कृषी व पणन कंपन्यांचा (फार्मर प्रोड्युसर कंपनी) महासंघ असलेल्या ‘महा-एफपीसी’ संस्थेने दिले होते. त्या मागणीला प्रतिसाद देत सरकारने हा निर्णय घेतला आहे. नाफेडकडून लवकरच कांदा खरेदीला सुरुवात होईल. तो माल दिल्ली व इतर राज्यांत पाठविला जाणार आहे. असेही संजीव कुमार चढ्ढा यांनी सांगितले आहे.



टॅग्स