18 January 08:30

कृषी सुधारणांसाठी कमी व्याजदराने वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्राला साकडे


कृषी सुधारणांसाठी कमी व्याजदराने वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्राला साकडे

कृषिकिंग, नवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन महाराष्ट्रातील कृषी सुधारणांसाठी नाबार्डकडून कमी व्याजदराने वित्त पुरवठा उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. राज्य सरकार हा निधी कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विशेषतः सिंचन क्षेत्रातील सुधारणांसाठी वापर करू इच्छित आहे, असेही फडणवीस यांनी जेटली यांना सांगितले आहे.

कृषी व सिंचन क्षेत्रामध्ये मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यासाठी नाबार्डने महाराष्ट्राला आतापर्यंत सुमारे एक हजार कोटी रुपये उपलब्‍ध करुन दिले आहेत. मात्र, यापेक्षा अधिक वित्तपुरवठा नाबार्डने उपलब्ध करुन द्यावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने मुंबईत १८ ते २० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत आयोजित पहिल्या ' ग्लोबल मॅग्नेटिक महाराष्ट्र - कन्व्हर्जन्स २०१८' या जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री.जेटली यांनीही फडणवीस यांच्या विनंतीवरून या परिषदेस उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.