24 February 14:36

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक


कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक

कृषिकिंग, सोलापूर: स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कारवर दगडफेक केली आहे. या दगडफेकीत खोत यांची कार फोडण्यात आली. कुर्डूवाडीजवळील रिधोर गावाजवळील ही घटना आहे. दिवसेंदिवस शेतकर्‍यांच्या समस्येत वाढ होत असताना, राज्यातील शेतकरी कर्जाला कंटाळून आत्‍महत्या करत असल्याच्या अशा विविध कारणांमुळे संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

याशिवाय खोत यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवून त्यावर गाजर, तूर व मका फेकून निषेध व्यक्त करण्यात आला. प्रत्येकवर्षी ऊस आंदोलने जोरात करणारे सदाभाऊ, यावर्षी ऊस कारखानदारांनी एकी करून पहिली उचल कमी दिली तरीही याविरोधात त्यांनी तोंड उघडले नाही. शेतक-यांची हमीभाव योजना व्यवस्थित राबवली नाही. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी योजना फसवी झालेली आहे. याचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हा संघटक सिद्धेश्वर घुगे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याप्रकरणी स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गारपीटग्रस्त जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावेळीदेखील सदाभाऊंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रोषाचा सामना करावा लागला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंना काळे झेंडे दाखवत, तीव्र विरोध केला होता. त्या धास्तीने सदाभाऊंना आपला गारपीटग्रस्त भागाचा दौरा अर्धवट सोडावा लागला होता. आजही अशाच प्रकारे पंढरपूर दौऱ्यावेळी सदाभाऊंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सामना करावा लागला आहे.