08 August 14:26

कुठे आहे मग सरासरीपेक्षा अधिक पाऊस?- राजू शेट्टींचा संतप्त सवाल


कुठे आहे मग सरासरीपेक्षा अधिक पाऊस?- राजू शेट्टींचा संतप्त सवाल

कृषिकिंग, पुणे/परभणी: हवामान खात्याच्या फसलेल्या अंदाजावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी सडकून टीका केली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असे हवामान विभागाने सांगितले होते. पण प्रत्यक्षात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. कुठे आहे मग सरासरीपेक्षा अधिक पाऊस? असा संतप्त सवालही राजू शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

त्यांचा खेळ होतो, शेतकऱ्यांचा मात्र जीव जातो. चंद्रावर काय होत आहे, मंगळावर काय होत आहे. हे तंत्रज्ञान आले आहे. मात्र, इथे पाऊस किती पडणार हे कळेना. मग हे जमणार नसेल तर भविष्य सांगणाऱ्याकडूनच अंदाज सांगावा, हवामान खात्याचा अंदाज बंद करावा. असे टीकास्त्रही शेट्टी यांनी यावेळी सोडले आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये गारपीट, वादळाचे अगदी मिनिटा-मिनिटाचे अंदाज दिले जातात. मग आम्ही काय करतोय. पंतप्रधान हे सतत विदेश दौरे करतात. त्यातला एखादा दौरा रद्द करून, त्या खर्चात हवामान खात्याचे एखादे सॅटेलाईट सोडता येईल. असा टोमणाही शेट्टी यांनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान, खते, बी-बियाणे, औषध कंपन्यांना फायदा पोहचवून देण्यासाठी, पॅकेज घेऊन हवामान खात्याने मराठवाड्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल. असा अंदाज व्यक्त केल्याचा गंभीर आरोप परभणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे. इतकेच नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष माणिक कदम यांनी हवामान खात्याच्या संचालकांविरोधात ४२० चा गुन्हा दाखल करण्यासाठी परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्जही दाखल केला आहे.