03 February 00:01

किमान निर्यातमूल्याच्या जोखडातून कांद्याची सुटका: भाव स्थिरावण्यास होणार मदत


किमान निर्यातमूल्याच्या जोखडातून कांद्याची सुटका: भाव स्थिरावण्यास होणार मदत

कृषिकिंग मार्केट रिसर्च कांद्यावर लागू असणारे ७०० डॉलर / टन हे किमान निर्यात मूल्य शून्य करण्याचा आदेश केंद्राने जारी केला असून यामुळे कांद्याची ठप्प झालेली निर्यात सुकर होण्यास मदत होणार आहे. निर्यात जवळपास थांबलेली असल्याने देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या दरात मोठी घसरण पहावयास मिळाली होती. आगामी दिवसात वाढणाऱ्या नव्या कांद्याची आवक पाहता केंद्राने पुढील आदेश येईपर्यंत कांद्यावरील एमईपी (किमान निर्यात मूल्य) 0 केले असून निर्यातीस यामुळे चालना मिळण्यास नक्कीच मदत होईल.

कृषिकिंग मार्केट रिसर्च कडून रविवारी (२८ जानेवारी) कांदा दराबाबत स्पष्ट केले होते कि निर्यात मूल्य दराबाबत काही घोषणा झाल्यास काही दिवसांसाठी मार्केट मध्ये तेजी राहू शकते. लासलगाव मार्केटला २९ जानेवारी रोजी कांद्याचे सरासरी १९५० रु. असे असणारे भाव हे २ फेब्रुवारीला निम्याहून कमी म्हणजे रु. १४०० वर घसरले. त्याचवेळी पुण्यात १००० रु. आणि श्रीरामपूर मध्ये लाल कांद्यास ९०० रु. तर मुंबई मार्केट मध्ये १७०० रु. दर मिळाला. इतर राज्यात मात्र दर अजूनही ३००० ते ४००० रु. पर्यंत टिकून आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्राने त्वरित उपाययोजना करीत कांद्याची एमईपी च्या जोखडातून मुक्तता करत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

निर्यातीस मिळेल चालना
भारतीय कांदा प्रामुख्याने बांगलादेश, आखाती राष्ट्रे, नेपाळ, श्रीलंका, फिलीपाईन्स, म्यानमार या राष्ट्रांत निर्यात होतो. एमईपी मूल्य जागतिक भावापेक्षा अधिक असल्याने निर्यातीला लगाम बसला होता. आता काही दिवसात निर्यात पूर्ववत होऊन देशांतर्गत बाजारपेठांमध्ये दर काहीसे सुधारू शकतील. कांद्याचे दर किमान २००० रु. च्या वर राहिले तरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा तोटा भरून निघू शकेल.टॅग्स