15 May 15:15

कांद्याला ५० पैसे किलो दर; रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध


कांद्याला ५० पैसे किलो दर; रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध

कृषिकिंग, नाशिक: नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याला अक्षरशः ५० पैसे प्रति किलो असा भाव पुकारला गेला. उत्पादन खर्चही न फिटणारा व डोळ्यांत पाणी आणणारा हा भाव मिळाल्याने तीन शेतकऱ्यांनी महामार्गावर आपला हा कांदा फेकून देत सरकारच्या शेतमालविरोधी धोरणाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.

उन्हाळ कांद्याची सध्या पिंपळगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. बाजारभाव सरासरी ६५० रुपये प्रति क्विंटलने पुकारले जात आहेत. तर खर्च फिटेल या उद्देशाने शेतकरी मिळेल, त्या भावात कांदा विक्री करीत आहेत.

दरम्यान, काल दुपारनंतर पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला किमान २०१ रुपये, कमाल ६४० रुपये तर तर सरासरी कमाल ४५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तिकडे लासलगाव बाजार समितीतही कांद्याला किमान ४०० रुपये, कमाल ८०० रुपये तर सरासरी ६३० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांमध्येही कांद्याला सरासरी ६५० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, असे असले तरी तिकडे वाशी कृषी उत्पन्न बाजारात समितीत कांद्याला थोडा चांगला दर मिळत आहे. वाशी मार्केटमध्ये कांद्याला किमान ७०० रुपये, कमाल ११०० रुपये तर सरासरी ९०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. हे सर्व बाजारभाव १४ मे २०१७ चे अर्थात कालचे आहेत. आज अमावस्या असल्यामुळे लिलाव बंद आहेत. त्यामुळे आजचे बाजारभाव उपलब्ध नाहीत.टॅग्स