29 November 11:20

कांद्याला योग्य भाव मिळण्यासाठी मागेल त्याला खरेदी परवाना द्या- सहकारमंत्री


कांद्याला योग्य भाव मिळण्यासाठी मागेल त्याला खरेदी परवाना द्या- सहकारमंत्री

कृषिकिंग, मुंबई: “कांद्याला योग्य भाव मिळून शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, कांदा खरेदीसाठी स्पर्धा निर्माण व्हावी, यासाठी राज्यात मागेल त्याला खरेदीदाराचा परवाना (डायरेक्ट मार्केटिंग लायसन्स) देण्यात यावा,” असे निर्देश पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत.

ईशान्येकडील राज्यात कांदा पाठविण्याच्या नियोजनाबाबत पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल आहेर, पणन विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, महाराष्ट्र कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, नाशिक उपनिबंधक नीलकंठ करे, महा एफपीओचे योगेश थोरात, मध्य रेल्वेचे एस.एस.सोनवणे, एमएसएएमबीचे दिग्विजय आहेर आदी उपस्थित होते.

“देशाच्या एकूण कांदा निर्यातीच्या ७० ते ८० टक्के निर्यात महाराष्ट्रातून होते. त्यातही नाशिक व लासलगावचा कांदा प्रसिध्द असून, त्याचा वाटा सर्वाधिक आहे. शेतकऱ्यांना कांदा विक्री करताना अडचण येऊ नये,मालाला योग्य भाव मिळावा, अडते व व्यापारी यांची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी खरेदीदार आणि अडत्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्यामुळे मागेल त्याला खरेदीदार परवाना देण्याचे धोरण नाशिकमध्ये सुरू करावे. त्यासाठी त्वरित जाहिरात द्यावी,” असे निर्देशही देशमुख यांनी दिले आहेत.

कांद्याच्या दरात गेल्या ८-१० वर्षात अचानक झालेला चढ-उतार आणि त्यावेळी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करून यावर्षीच्या कांद्याच्या खरेदीचे नियोजन करावे. तसेच राज्यातील कांद्याला ईशान्येकडील राज्यांमध्ये मोठी मागणी आहे. तेथे कांद्याला भावदेखील चांगला आहे. त्याठिकाणी राज्यातील कांद्याची शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत निर्यात करण्यात यावी. चंदिगढ, दिल्ली, कोलकाता येथे शासकीय गोदाम उपलब्ध करून द्यावे आणि शासनाने कांदा ठेवण्यासाठी स्वत:चे गोदाम घ्यावे,” अशा सूचना देशमुख यांनी केल्या आहेत.

तसेच कोलकाता जवळील फतुहासह चितपुर, मालडा, आझादपूर याठिकाणी कांद्याला चांगला भाव आणि मागणी आहे. परंतु त्याठिकाणी रेल्वेने माल पाठविल्यावर काही तांत्रिक अडचणी येतात. फतुहा येथे कांद्याची वाहतूक सुलभतेने व्हावी यासाठी रेल्वेमंत्र्यांशी पत्रव्यवहार करण्याचे निर्देशही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले असून, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्याची सूचना त्यांनी केली आहे.टॅग्स