04 February 17:10

कांद्याप्रमाणेच द्राक्षाचाही झाला वांदा; खर्चही फिटेना


कांद्याप्रमाणेच द्राक्षाचाही झाला वांदा; खर्चही फिटेना

कृषिकिंग, नाशिक: नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या द्राक्ष पिकाचे हंगामाच्या सुरवातीलाच भाव गडगडले आहे. वर्षातून एकदाच घेतल्या जाणाऱ्या पिकाचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हवालिदल झाले आहे. निर्यातक्षम द्राक्ष अवघे ५५ ते ६० रुपये तर लोकल द्राक्ष ३० ते ३५ रुपये किलो दराने विक्री होत असल्याने कांद्याप्रमाणेच द्राक्षांचा वांदा झाला आहे.

द्राक्ष हे वर्षातून एकदा घेतले जाणारे पीक असल्याने पुढील वर्षी फळ येण्यासाठी वर्षभर खर्च करावा लागतो. द्राक्ष लागवडीचा खर्च हा किमान एकरी चार ते पाच लाख रुपये असल्याने प्रथम मोठे भांडवल खर्च करून पीक उभे करावे लागते. याशिवाय मशागती दरम्यान अनेक समस्या असल्याने यावर्षीचा द्राक्ष हंगाम शेतकऱ्यांना कांद्यासारखाच रडविणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.

नैसर्गिक आपत्ती आणि रासायनिक खतांच्या वाढलेल्या भरमसाठ किंमती, बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेले अनेक फसवे औषधे, वाढती मजुरी यामुळे बाग पिकवणे आणि टिकवणे जिकीरीचे झाले आहे. त्यातच यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांनी पाणी विकत घेऊन द्राक्ष बागा टिकवून ठेवल्या आहेत, त्यामुळे खर्च वाढला आहे. अशा परिस्थितीत निर्यातक्षम द्राक्षाला किमान ८० ते ९० व लोकल द्राक्षाला ४५ ते ५० रुपये भाव मिळाला तरच शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडते. असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.टॅग्स