30 November 09:52

कांद्याच्या पैशाची पंतप्रधान मोदींना मनीऑर्डर; पाहा काय आहे बातमी...


कांद्याच्या पैशाची पंतप्रधान मोदींना मनीऑर्डर; पाहा काय आहे बातमी...

कृषिकिंग, नाशिक: कांद्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे जिल्हाभरात ठिकठिकाणी शेतकरी रास्ता रोकोसारखी आंदोलने करीत असतानाच नैताळे येथील एका शेतकऱ्याने काल (गुरुवारी) निफाड उपबाजार आवारात झालेल्या लिलावातून मिळालेल्या पैशांची मनीआॅर्डर, चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवत शेतकऱ्यांचा सार्वत्रिक संताप प्रदर्शित केला आहे.

कांद्याचे दर ५० पैसे व १ रुपया प्रति किलोपर्यंत घसरले असल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नाही. परिणामी, शेतकरी रस्त्यावर उतरत कांदा ओतून देऊन संतापाला वाट मोकळी करून देत आहे. मात्र, नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी आपल्या अनोख्या निषेधाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

निफाड येथील उपबाजार आवारात काल (गुरुवारी आणलेल्या कांद्याला अवघा १५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने संजय साठे यांनी कांदा लिलावाचे आलेले हे पैसे चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनीआॅर्डर करून पाठवून दिले आहे. यावेळी त्यांनी कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरवर बॅनर लावून त्यात आपल्या भावना व्यक्त केल्या.

बॅनरवर लिहिले होते, ‘शेतकरी-व्यापारी बंधूंनो आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असून, त्याकडे कुणीही गांभीर्याने पाहत नाही. या शेतकऱ्यांच्या व्यथा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळाव्यात या उद्देशाने मी आणलेल्या सर्व कांद्याचे पैसे आॅनलाइन मनीआॅर्डरद्वारे पंतप्रधानांना पाठविणार असून, मी जे काही करीत आहे हे कुठल्याही राजकीय हेतूने करीत नाही. तर केवळ शेतकऱ्यांच्या व्यथा पंतप्रधानांना कळाव्यात हाच उद्देश आहे.’

निफाड उपबाजार येथे कांदा लिलाव होईपर्यंत बॅनर लावलेल्या साठे यांच्या ट्रॅक्टरकडे व्यापारी व शेतकरी कुतूहलाने पाहत होते. त्यांना कांद्याचे एकूण १०६४ रुपये मिळाले. त्यानंतर साठे यांनी थेट टपाल कार्यालय गाठले. कांदा लिलावातून आलेले १०६४ रुपये आणि त्यात स्वत:च्या खिशातून ५४ रुपये घालून एकूण १११८ रुपये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने नवी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाला पाठवून दिले. अकरावा महिना आणि सन २०१८ साल यामुळे त्यांनी १११८ रुपयाची रक्कम पंतप्रधानांना पाठविल्याचे सांगितले आहे.टॅग्स