05 February 15:39

कांद्याच्या दरात ७०० रुपयांनी वाढ; शेतकरी समाधानी


कांद्याच्या दरात ७०० रुपयांनी वाढ; शेतकरी समाधानी

कृषिकिंग, लासलगाव, (नाशिक): केंद्र सरकारने शुक्रवारी संध्याकाळी किमान निर्यात मूल्य रद्द केल्यांनतर आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांदा मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. आज लासलगाव बाजार समितीत कांदा दरात क्विंटलमागे ७०० रुपयांनी वाढ नोंदवली गेली आहे. लासलगाव मार्केटमध्ये आज कांद्याला कमाल २२०० रुपये, किमान १२०० रुपये तर सरासरी २०७५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. सरकारच्या निर्णयानंतर सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कांदा निर्यातमूल्य शून्य झाल्यानंतर आता दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांत तीन हजार रुपयांनी विक्री होणारा लाल कांदा आवक वाढल्याने मागील आठवड्यात १५०० रुपयांवर येऊन ठेपला होता. त्यात निर्यातमूल्य शून्य केल्याने आता मार्चपर्यंत कांद्याचे दर स्थिर राहतील, असा अंदाज निर्यातदारांनी व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटकमधील कांदा बाजारपेठेत दाखल होऊ लागला असला तरी निर्यात सुरू होणार असल्याने भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे.

निर्यातबंदीमुळे यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याच्या मागणीत वाढ झाली होती. याचकाळात पाकिस्तानमध्ये किमान निर्यातमूल्य शून्य असल्याने तेथील निर्यातदारांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा विक्री करून वर्चस्व निर्माण केले होते. मात्र, आता भारतातून कांदा निर्यात होण्यास सुरुवात होताच पाकिस्तानचे वर्चस्व कमी होणार आहे.टॅग्स