27 February 10:37

कांद्याच्या दरात पुन्हा ४०० रुपयांची घसरण


कांद्याच्या दरात पुन्हा ४०० रुपयांची घसरण

कृषिकिंग, लासलगाव(नाशिक): निर्यातमूल्य संपूर्णपणे हटवल्यानंतर कांद्याचे भाव वाढतील, असा अंदाज आता खोटा ठरताना दिसत आहे. कारण सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्वच कांदा मार्केटमध्ये बाजारभाव सातत्याने गडगडत आहेत. मागील आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी १४५० रुपये प्रति क्विंटलवर असलेला कांदा या आठवड्यात मार्केट सुरु होताच सोमवारी ९०० रुपये पर्यंत खाली आल्यामुळे शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. लासलगाव बाजार समितीत सोमवारी कांद्याला किमान ९०० रुपये, कमाल १२०१ रुपये तर सरासरी ११०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

मागच्या आठवड्याच्या तुलनेत देशातील इतरत्र असलेल्या राज्यांमध्ये कांद्याचे विक्रमी पिक निघाल्यामुळे कांद्याचे दर कोसळण्यास सुरुवात झाली असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. तर या महिन्याच्या सुरुवातीला ५ फेब्रुवारीला असणाऱ्या भावाच्या तुलनेत कांदा दरात १३०० रुपयांची घसरण झाल्याने कांद्याचे हजार-अकराशे रुपयांच्या आसपास पोहचले आहेत.

जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांमध्येही कांद्याला सरासरी १००० रुपये क्विंटलच्या आसपास दर मिळाला. नाशिक मधील पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याला किमान ८०० रुपये, कमाल १३५७ रुपये तर सरासरी १०५७ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला, तसेच महत्वाची बाजार समिती असलेल्या उमराणा बाजार समितीत कांद्याला किमान ९०० रुपये, कमाल १३०० रुपये तर सरासरी १००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तर इकडे पुणे बाजार समितीतही कांद्याच्या दरात शुक्रवारच्या तुलनेत २०० रुपयांनी घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी असणाऱ्या सरासरी १००० रुपये प्रति क्विंटल दराच्या तुलनेत सोमवारी सरासरी ८०० रुपयांपर्यंत घसरण झाली. पुण्यात सोमवारी कांद्याला किमान ५०० रुपये, कमाल १३०० रुपये तर सरासरी ८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.टॅग्स