01 February 15:39

कांद्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण


कांद्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण

कृषिकिंग, लासलगाव (नाशिक): महाराष्ट्रासह इतर राज्यात कांद्याची वाढलेली आवक आणि प्रतिटन असलेले ७०० डॉलर असलेल्या निर्यातमूल्यामुळे लाल कांद्याच्या दरात सोमवारच्या तुलनेत ३०० ते ४०० रुपयांची घसरण झाली आहे. तर मागील आठवड्यापासून आतापर्यंत दरात १२०० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे कांदा उत्पादकांमध्ये चिंता वाढली आहे.

या आठवड्यात सोमवारी लासलगाव मार्केट सुरु होताच कांद्याला १८०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी २००० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. सध्या लासलगाव मार्केटमध्ये कांद्याला ६०० ते १८५१ रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी १६५० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. म्हणजेच गेल्या दोनच दिवसांत कांद्याच्या दरात जवळपास ४०० रुपयांपेक्षा अधिक घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये दररोज दोन ते अडीच लाख क्विंटल कांद्याची आवक होत आहे. त्याचबरोबरर पुणे, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून लाल कांद्याची मोठी आवक होत आहे. त्यामुळे नाशिकच्या लाल कांद्याची मागणी कमी झाल्याने ही घसरण होत आहे. त्यातच निर्यातमूल्य ७०० डॉलर असल्यामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे निर्यात मूल्य दर हे कमी करून निर्यात कशी होईल याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावे.
- कांदा व्यापारी, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.टॅग्स