11 January 10:50

कांद्याच्या दरात क्विंटलमागे ७५० रुपयांनी घसरण


कांद्याच्या दरात क्विंटलमागे ७५० रुपयांनी घसरण

कृषिकिंग, नाशिक: गुजरात आणि राजस्थानमधील नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने, कांद्याचे आगार मानल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील चार दिवसांत क्विंटलमागे ७५० रुपयांनी भाव कोसळले आहेत. तसेच पिंपळगाव बसवंतमध्ये ४५० रुपयांनी भाव घसरले. त्याचवेळी ग्राहकांना अधिक भावाने कांदा खरेदी करावा लागू नये, म्हणून प्रतिटन ८५० डॉलर किमान निर्यातमूल्य करण्यात आल्याने निर्यातीत घट झाली आहे.

निर्यातमूल्य हटविण्यात आल्याने २०१६-१७ मध्ये विक्रमी म्हणजेच, ३४ लाख ९२ हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली होती. यंदा आतापर्यंत १५ लाख ३ हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीसाठी पाठविण्यात आला आहे. लासलगावमध्ये ५ जानेवारीला दीड हजार ते ३ हजार ८०० आणि सरासरी ३ हजार ५४० रुपये क्विंटल या भावाने कांदा विकला गेला होता. दोन दिवसांत इथे सरासरी भाव ३ हजार १०० रुपये असा राहिला. ९ जानेवारीला २२ हजार ७२४ क्विंटल कांदा दीड हजार ते ३ हजार ४६३ आणि सरासरी २ हजार ९०० रुपये क्विंटल भावाने शेतकऱ्यांना विकावा लागला. तर काल म्हणजेच १० जानेवारीला १८ हजार क्विंटल कांद्याची दीड हजार ते ३ हजार २०० आणि २ हजार ७५० रुपये क्विंटल या भावाने विक्री झाली. पिंपळगाव बसवंतमध्ये ५ जानेवारीला क्विंटलला कांद्याचा सरासरी भाव ३ हजार २५१ रुपये असा राहिला होता. तर १० जानेवारीला २ हजार ८०० रुपये क्विंटल या सरासरी भावाने शेतकऱ्यांना कांदा विकावा लागला आहे.

"जागतिक बाजारपेठेमध्ये प्रतिटन ३०० ते ३५० डॉलर म्हणजेच भारतीय रुपयात २० हजार प्रति टन दराने कांदा विकला जात आहे. भारतीय कांद्याचे किमान निर्यातमूल्य ८५० डॉलर असल्याने ग्राहक मिळणे मुश्‍कील झाले आहे. (कारण ८५० डॉलर म्हणजे भारतीय रुपयात ५५ हजार प्रति टन इतके निर्यातमूल्य). म्हणजेच आपला कांदा जागतिक बाजारात ३५ हजार प्रति टनाने महाग पडतो. सध्यस्थितीत देशांतर्गत कांद्याची आवक वाढत आहे. त्यातच कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे देशाच्या गरजेच्या ५० लाख टनांचे अधिक उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे केंद्र सरकारने किमान निर्यातमूल्य हटविणे आवश्‍यक आहे." असे नाफेडचे माजी अध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी सांगितले आहे.टॅग्स