22 May 11:39

कांद्याच्या दरात उसळी; घाऊक बाजारात १०९ रुपयांनी वाढ


कांद्याच्या दरात उसळी; घाऊक बाजारात १०९ रुपयांनी वाढ

कृषिकिंग, लासलगाव(नाशिक): नाफेडसह शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा साठवणूक करण्यास सुरुवात केल्याचा परिणाम घाऊक बाजारात पाहायला मिळतो आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी बाजार सुरु होताच कांद्याच्या दरात १०९ रुपयांनी वाढ होऊन, तो सरासरी ७१० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचला आहे. मे महिन्याच्या प्रारंभी सरासरी ७२० रुपये प्रति क्विंटल असणारा कांदा १८ मे रोजी सरासरी ६०१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला होता. मात्र, त्यात आता पुन्हा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच यापुढील काळात कांद्याच्या दरात उत्तरोतर वाढ होईल. असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमीच्या तुलनेत कमी आवक पाहायला मिळाली. काल मार्केटमध्ये १३ हजार ४३५ क्विंटल इतकी आवक झाली. तर कांद्याला किमान ४०० रुपये, कमाल ९०० रुपये तर सरासरी ७१० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.

नाफेडसह शेतकऱ्यांनी दर्जेदार कांद्याची साठवणूक करण्यास सुरवात केली आहे. उत्पादित मालातील दुय्यम प्रतीचा कांदा सध्या बाजारात विक्रीसाठी आणला जातो आहे. मात्र सध्या त्यास चांगला भाव मिळत नाहीये. अशी माहिती नाफेडचे माजी उपाध्यक्ष चांगदेव होळकर यांनी दिली आहे. दुय्यम मालाला चांगला दर मिळावा. अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. पुढील सहा महिन्यात देशात ६० ते ७० लाख टन कांदा लागणार आहे. देशात कांद्याचे पुरेसे उत्पादन असून निर्यातीला चालना देण्याची गरज आहे. निर्यातीला अनुदान देऊन सरकारला परदेशी चलन प्राप्त करता येईल. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांदा टिकून राहील. तसेच पुढील काळात कांद्याचे दर हे हळूहळू वधारणार आहेत. ऑगस्टच्या मध्यानंतर कांद्याचे दर हे १२०० ते १३०० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास राहतील. असा अंदाज होळकर यांनी व्यक्त केला आहे.

मात्र, मागील हंगामात कांदा साठवणूक करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे हात पोळले होते. यामुळे कांदा साठवावा की नाही याविषयी अनेक शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. मागील वर्षी साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील मिळाला नाही.टॅग्स