23 November 18:03

कांद्याचे निर्यात मूल्य प्रतिटन ८५० डॉलर; केंद्र सरकारचा निर्णय


कांद्याचे निर्यात मूल्य प्रतिटन ८५० डॉलर; केंद्र सरकारचा निर्णय

कृषिकिंग, नवी दिल्ली: “कांद्याचा वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी कांद्यावर प्रति टन ८५० डॉलर इतके निर्यात मूल्य (एमईपी) लागू करण्याच्या निर्णय आज केंद्र सरकारने घेतला आहे. कांद्यासाठी निर्धारित करण्यात आलेले प्रतिटन ८५० डॉलर हे निर्यात मूल्य येत्या ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत लागू असणार आहे.” असे केंद्र सरकारच्या विदेशी व्यापार महासंचालनालयाकडून (डीजीएफटी) प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

देशातील कांद्याच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर दोन आठवड्यांपूर्वीच केंद्र सरकारच्या मूल्य स्थिरीकरण निधीच्या (प्राइस स्टॅबिलायझेशन फंड) व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये कांद्याच्या दरवाढीबद्दल चर्चा होऊन कांदा आयातीचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीला नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक, एमएमटीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालकही उपस्थित होते.

यावेळी नाफेड आणि एसएफएसी या कंपन्यांना देशांतर्गत कांदा उत्पादक प्रदेशांमधून अनुक्रमे दहा हजार टन आणि दोन हजार टन कांदा खरेदी करण्यास तर एमएमटीसी या सरकारी एजन्सीला दोन हजार टनांची आयात करण्यात मंजुरी देण्यात आली होती. तर आता निर्यात कमी होण्याच्या उद्देशाने निर्यातमूल्यात वाढ करत ते प्रतिटन ८५० डॉलर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.टॅग्स