23 May 09:59

कांद्याचे नवीन संशोधित वाण मान्यतेच्या प्रतीक्षेत


कांद्याचे नवीन संशोधित वाण मान्यतेच्या प्रतीक्षेत

कृषिकिंग, नाशिक: चितेगाव फाटा येथील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन तथा विकास प्रतिष्ठानतर्फे संशोधित केलेल्या कांद्याचे नवीन वाण केंद्रीय समितीच्या मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे. प्रतिष्ठानने एल-८१९ वाणाचा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी समितीला पाठवला आहे. वाणाला मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या बिजोत्पादनाची प्रक्रिया सुरु होऊन शेतकऱ्यांच्या हातात नवीन वाणाचे बियाणे पोचेपर्यंत किमान वर्षभराचा कालावधी अपेक्षित आहे.

तर एकरी १६० क्विंटलच्या आसपास उत्पादन मिळेल, अशा लाल ४- एल ७४४ वाणाचे प्रतिष्ठानतर्फे बिजोत्पादन सुरु करण्यात आले आहे. बिजोत्पादन करार पद्धतीने शेतकऱ्यांकडून करुन घेण्यात येत आहे. महाराष्ट्रातील बिजोत्पादनातून उपलब्ध होणारे या वाणाचे बियाणे राज्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात मिळणार आहे. यंदा कमी प्रमाणात नवीन वाणाचे बियाणे उपलब्ध होणार असून, पुढील वर्षापासून बियाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल, असे प्रतिष्ठानच्या शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

लाल ४- एल ७४४ वाण खरीप आणि रब्बी हंगामासाठी असून, ७ ते ८ किलो बियाणे एकरी पुरेसे ठरते. लागवडीनंतर सर्वसाधारणपणे चार महिन्यात कांदा काढणीला येतो. गोल आणि गडद लाल रंगाचा हा कांदा आहे. दरम्यान, केंद्रीय समितीच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत असलेला एल-८१९ हे वाण सुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.