13 February 17:12

कांद्याची चोरी; शेतकऱ्यांवर कांदा राखण करण्याची वेळ


कांद्याची चोरी; शेतकऱ्यांवर कांदा राखण करण्याची वेळ

कृषिकिंग, देवळा (नाशिक): नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात वरवंडी येथील शेतकरी पांडुरंग शिंदे यांच्या शेतातून २० ते २५ क्विंटल पोळ कांदा चोरीस गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. तालुक्यात कांदे चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून, शेतात आता त्यांच्यावर कांदा पोळींची राखण करण्याची वेळ आली आहे.

कधी काळी देवळा तालुका हा दर्जेदार, निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध होता. त्या काळात शेतातून डाळिंब चोरीला जाण्याच्या घटना नेहमी घडत असत. कालांतराने तेल्या, मर रोगामुळे डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या. यामुळे शेतकरी पुन्हा कांदा लागवडीकडे वळले. ज्या भागात डाळिंबाच्या बागा आहेत, तिथे चोरीचे प्रकार घडत आहेत. मागील चार ते पाच महिने कांदा भाव तेजीत राहिल्यामुळे लहान-मोठ्या सर्वच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. दहा दिवसांपूर्वी देशातील इतर भागातून कांद्याची आवक वाढल्यावर अडीच हजार रुपयांवर असणारे दर सरासरी १४०० रुपयांपर्यंत खाली आले होते. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने ७०० डॉलरवर असणारे किमान निर्यात मूल्य हटवून निर्यातीचा मार्ग खुला केला होता.

या निर्णयामुळे कांद्याच्या भावात चांगलीच सुधारणा होऊन ते अडीच हजार रुपयांवर पोहोचले. मात्र, कांदा भावात सुधारणा झाल्यापासून ते चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. वरवंडी येथील पांडुरंग शिंदे या शेतकऱ्याच्या शेतातून चोरटय़ांनी चारचाकी वाहन आणून २० ते २५ क्विंटल कांदा चोरून नेला. बाजारभावानुसार या शेतकऱ्याचे अंदाजे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. या घटनाक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतातील कांदा पोळींची राखण करण्याची वेळ आली आहे.

शेतातून काढलेला कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडे पुरेशी व्यवस्था नसते. खळ्यात तो झाकून ठेवला जातो. आजवर त्याची राखण करण्याची वेळ कधी आलेली नव्हती. परंतु, जेव्हा त्याचे दर गगनाला भिडतात, तेव्हा चोरटय़ांची ते लंपास करण्याकडे नजर असल्याचे देवळा तालुक्यातील घटनांवरून उघड झाले आहे. शेतात काबाडकष्ट करून पिकवलेल्या कांद्याची चोरी होऊ नये म्हणून आता अनेकांना काढणीनंतर शेतात त्याची राखण करावी लागत आहे.टॅग्स