16 February 13:00

कांद्याची आवक दीड पटीने वाढली; भावात घसरण सुरूच


कांद्याची आवक दीड पटीने वाढली; भावात घसरण सुरूच

कृषिकिंग, नाशिक: नाशिक जिल्ह्य़ातील लासलगाव, पिंपळगाव बसवंतसह इतरही बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक प्रचंड वाढली आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीच्या मध्यावर लाल कांद्याची आवक दीड पटीने वाढली असल्याचे समोर आले आहे.

लासलगाव बाजार समितीत गेल्या महिन्यात दररोज २० हजार क्विंटल आवक होत होती. या महिन्यात ती ३० हजार क्विंटलवर गेली आहे. पिंपळगाव बाजार समितीतही यापेक्षा वेगळे चित्र नाही. तिथेही बाजार समितीत कांद्याचा महापूर पाहायला मिळत आहे.

लासलगाव बाजार समितीत जानेवारी महिन्यात कांद्याला सरासरी ५८० रुपये भाव मिळाला होता. फेब्रुवारीत प्रति क्विंटलचा हा दर ४५० रुपयांवर आला आहे. प्रचंड उत्पादन आणि मागणीचा अभाव यामुळे महिनाभरात कांदा भावात १३० रुपयांनी घसरण झाली आहे.

केंद्र, राज्य सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काही निर्णय घेतले. मात्र, त्याचाही बाजारपेठेवर परिणाम झाला नाही. निर्यात प्रोत्साहनपर अनुदान ५ टक्क्यांवरून १० टक्क्य़ांवर नेण्यात आले. परंतु, त्याचाही फारसा लाभ झालेला नाही. सध्या नाशिकमधील बाजार समित्यांचे आवार कांद्याने भरून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राज्य शासनाने नोव्हेंबर, डिसेंबर जानेवारी महिन्यात विक्री झालेल्या कांद्यास २०० रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले आहे. पुढील काळात उत्पादित होणाऱ्या कांद्यासाठी अनुदान सुरू ठेवावे, ते प्रतिक्विंटल ५०० रुपये करावे. तसेच प्रति शेतकरी २०० क्विंटलची मर्यादा काढून टाकून सरसकट अनुदान द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.टॅग्स