21 June 13:31

कांद्याची आज पुन्हा उसळी; १४५१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढ


कांद्याची आज पुन्हा उसळी; १४५१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढ

कृषिकिंग, पिंपळगाव बसवंत(नाशिक): कांद्याने पुन्हा एकदा प्रति क्विंटल १०० रुपयांची उसळी घेतली असून, नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समितीत आज (२१ जून) कांद्याला कमाल १४५१ प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला आहे. राजस्थान व मध्यप्रदेशात उन्हाचा पारा प्रचंड वाढल्याने साठवणूक केलेला कांदा खराब झाला आहे. परिणामी, नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असून, जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कांदा तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

याशिवाय नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत कांद्याला आज (२१ जून) किमान ५०० रुपये, कमाल १३२१ रुपये, तर सरासरी ११७५ रुपये इतका दर मिला आहे. जो या आठवड्याच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी (सोमवारी) सरासरी ९२० रुपये इतका होता. तर मंगळवारी सोमवारच्या भावाच्या तुलनेत १०० रुपयांनी वाढ होऊन, तो सरासरी १०५० रुपये प्रति क्विंटल, तर कमाल दरात १३०० रुपयांच्या आसपास पोहचला होता. त्यामुळे सध्या कांदा तेजीत असून, यापुढे काही दिवस तरी कांदा दर कमी होण्याची शक्यता नसल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.

कांदा दरात तेजी आली की, केंद्र सरकारतर्फे हालचाल करून भाव पाडण्याचे प्रयत्न केले जातात. चाळीत साठवलेला कांदा विक्रीस आणला जात असल्याने चार पैसे मिळावे, ही शेतकऱ्यांची अपेक्षा असते. त्यामुळे दर वाढले तरी शासनाने हस्तक्षेप करू नये, अशीच अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहे.टॅग्स