09 October 11:23

कांद्याचा दर मागील सहा आठवड्यांच्या सर्वोच्च पातळीवर


कांद्याचा दर मागील सहा आठवड्यांच्या सर्वोच्च पातळीवर

कृषिकिंग, लासलगाव: मागील महिन्यात केंद्र सरकारद्वारा महाराष्ट्रातील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. परंतु, आता कांद्याचा दर मागील सहा आठवड्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहचला आहे.

सध्या प्रमुख कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा दर २१.५० रुपये प्रति किलो आहे, जो आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या छापेमारीनंतरच्या १९ सप्टेंबरला असलेल्या १३.५० रुपये या सर्वात कमी कांद्याच्या दराच्या ५८ टक्क्यांनी जास्त आहे. तसेच देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही या काळात १५ रुपये प्रति किलो असलेला कांदा, २५ रुपये प्रति किलोपर्यंत पोहचला आहे. तर काही प्रमुख किरकोळ बाजारांतही कांदा सध्या ३० ते ३५ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. मागील दोन आठवड्यापासून कांद्याचे दर बाजार समित्यांमध्ये योग्य ती आवक होत असतानाही वाढत आहेत.

“गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, आणि पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुरामुळे, देशभरात महाराष्ट्रातून कांद्याची मागणी वाढत आहे. कर्नाटकमध्येही कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता देशभरातील कांद्याची मागणी ही पूर्णतः महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यावर अवलंबून आहे. तसेच सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवकही सामान्य आहे.” असे लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

तर नाशिक येथील कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले आहे की, “बाजार समितीत येणारा संपूर्ण कांदा हा विकला जात असून, कांदा खरेदीदार खरेदीसाठी कांदा येण्याची वाट पाहत असतात. तसेच खरेदीदार शेतकरी मागत असलेला दर द्यायलाही तयार आहेत.”

फळबाग निर्यातदार संघाचे अध्यक्ष अजित शाह यांनी सांगितले आहे की, “खरीप हंगामातील कांदा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटीपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. परंतु, यावर्षी कांदा बाजारात येण्यासाठी मागील वर्षीच्या तुलनेत एक आठवडा उशीर होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत कांद्याचे दर प्रति किलो २५ रुपये ते ३० रुपये प्रति किलो राहण्याची शक्यता आहे.”

कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, “काही राज्यांमध्ये उशिरा झालेला मॉन्सूनचा पाऊस, तर काही राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेला महापूर यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी अन्य पिकांची लागवड केली असली तरी, यावर्षी कांद्याचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.”टॅग्स