07 August 08:10

कांदा: ९ दिवसात ठोक दर आणि आवक दुपटीने वाढली, काय आहे नेमकी परिस्थिती?


कांदा: ९ दिवसात ठोक दर आणि आवक दुपटीने वाढली, काय आहे नेमकी परिस्थिती?

कृषिकिंग मार्केट रिसर्च ४ ऑगस्ट पर्यंतच्या प्राप्त मार्केट आकडेवारीनुसार देशातील व राज्यातील बाजारसमितीमध्ये कांद्याची आवक जवळपास दुप्पट वाढली तर दरातही त्याच पटीत वाढ झाली.
२७ जुलै आणि ४ ऑगस्ट रोजी झालेली कांदा आवक आणि सरासरी दर आकडेवारी खालील प्रमाणे

२७ जुलै
देशातील बाजारसमितीमध्ये एकूण आवक १९,२३५ टन आवक झाली त्यात ६२५ ते १०९० /क्विंटल (सरासरी ९२६) असा एकूण आकडेवारीचे सरासरी विश्लेषण मिळते. त्याचवेळी महाराष्ट्रातील बाजारसमितीमध्ये झालेली आवक ११,१०८ टन इतकी नोंदवली गेली.
ठळक आकडेवारी
मार्केट नाव: दर प्रतिक्विंटल कमाल-किमान
आवक (टन) / दर (सरासरी)
पिंपळगाव : ४००-१५०० रु.
१६७१टन / ११५०रु.
बंगळूर : ७५०-१४०० रु.
१६५२ टन / १०४५ रु.
मुंबई : ९००-१००० रु.
१५९६ टन/ ९५० रु.
पुणे : ५००-१००० रु.
१११८ टन /९०० रु.
लासलगाव: ६००-१४५१ रु.
८०० टन / १२५० रु.
देशात सर्वोच्च भाव कलकत्ता मार्केट सरासरी १५३८ रु. (१४४ टन आवक)

४ ऑगस्ट
२७ जुलै च्या तुलनेत देशातील बाजारसमितीमध्ये एकूण आवक ३३,०६६ टन नोंदविली गेली (१३,८३० टन वाढ) त्यात ११२७ ते २१०९ /क्विंटल (सरासरी १७३३, ८३३ रु. ने वाढ) असे एकूण आकडेवारीचे सरासरी विश्लेषण मिळते. त्याचवेळी महाराष्ट्रातील बाजारसमितीमध्ये झालेली आवक २४,४३४.४ टन (१३,३२६ टन वाढ) इतकी नोंदवली गेली. तेजीच्या दरम्यान देशात वाढलेली आवक हे महाराष्ट्रातील बाजारपेठांतील वाढत्या आवकीचा परिणाम म्हणून दिसत आहे.
ठळक आकडेवारी
मार्केट नाव: दर प्रतिक्विंटल कमाल-किमान
आवक (टन) / दर (सरासरी)

पिंपळगाव : ६००-२४६६ रु.
३४३८ टन / २०११ रु.
राहुरी : ५००-२७०० रु.
३१३६ टन / २१०० रु.
लासलगाव : ८०० -२४०० रु.
२००० टन / २१६० रु.
मुंबई : २५००-२८०० रु.
१९६० टन/ २६५० रु.
पुणे : १५००-२६०० रु.
१८७६ टन /२००० रु.

देशात सर्वोच्च भाव पलायम (केरळ) सरासरी २८०० रु. (५० टन आवक) पाठोपाठ मुंबई, सरासरी २६५० (आवक १९६० टन).

कांद्यातील तेजीचा मार्केटमधील व्यवहारांवर प्रभाव असून, आवक वाढली आहे. शेतकरी दीर्घ कालापासून तेजीच्या प्रतीक्षेत होता, त्यात दीड वर्षाच्या मंदीनंतर सदर तेजी होणे अपेक्षित होते. मात्र ती कधी होईल याबाबत कुणालाच नेमका अंदाज नव्हता. व्यापाऱ्यांनाही कल्पना नव्हती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी करून साठे केले असण्याचीही शक्यता कमी आहे. कृषिकिंगने ३१ मे रोजी अॅपमध्ये दिलेल्या फंडामेंटल विश्लेषणात स्पष्ट केले होते की देशांतर्गत वार्षिक मागणी (१८५ लाख टन), आणि जास्तीचे असणारे उत्पादन यापेक्षा जास्त कांदा निर्यात करण्यात आल्यामुळे मंदी राहण्याचे कारण नाही. सविस्तर वाचा - http://bit.ly/2wklD3z

सध्या कर्नाटकातील दुष्काळामुळे गेलेले पिक, खरिपाच्या लागवडीत देशात आणि प्रामुख्याने कांद्याचे आगार असणाऱ्या महाराष्ट्रात राज्यात झालेली घट तसेच बागायती पट्ट्यात ऊसलागवडीखाली क्षेत्र वळते झाल्याच्या शक्यतेने कांदा लागवडीत घट दिसून आली आहे. यामुळे कांद्याची तेजी आणि कमतरता टप्प्याटप्प्याने वाढत जाईल. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तेजीस काहीसा लगाम बसू शकेल असे व्यापारी सांगतात, मात्र तेजी ही होत राहणारी आहे. शेतकऱ्यांनी कांदा लागवडीचे नियोजन करावे. त्यातही कमी दिवसात कांदा पिक कसे तयार होईल असे नियोजन केल्यास तेजीच्या वरच्या भावाचा नक्कीच लाभ घेता येईल. इतर राज्यातील अपारंपारिक कांदा उत्पादक लगेच कांदा लागवडीस कितपत उद्युक्त होईल याबाबत नक्की कल्पना नाही. एक्स्पोर्टचे वायदे निर्यातदार कसे पूर्ण करू शकतील याबाबतही स्थिती प्रतिकूल ठरणार आहे. आयातीच्या बाबत म्हणाल तर बाहेरील देशांत मोठ्या प्रमाणात कांदा आहे असे मानायचे कारण नाही. कुठूनतरी हजार पाच हजार कांदा बंदरात आला की आयात झाली म्हणून संभ्रम निर्माण करून खरेदीचे दर पाडण्याचे प्रकार घडतात, आणि शेतकरी मंदीच्या शक्यतेने दबावात विक्री करतो. शेतकऱ्याने आकडेवारी समजून घेणे, देशाची गरज ५० हजार टन रोजची आहे. त्यानुसार थोडी फार आयात झाली तर त्याने विशेष फरक पडणार नाही.

चाळीमध्ये साठवलेला गुणवत्तापूर्ण कांदा अजूनही तेजीत विकता येऊ शकेल असे वातावरण आहे. याबाबत सविस्तर आकडेवारी आणि अंदाज कृषिकिंग अॅप आणि एसएमएस सेवेद्वारे सातत्याने दिले गेले आहेत. यापुढेही तेजीमंदी बाबत सविस्तर माहिती जाणून घ्या आणि निर्णय घ्या. नोटाबंदी मुळे रोकडेची कमतरता असल्यानेही मोठ्या प्रमाणात खरेदी करून साठा होणे शक्य होणारे नाही. तसेच व्यापारी देखील सरकारच्या भीतीने फार साठा करतील असे दिसत नाही. मात्र काही व्यापारी शेतकऱ्याच्या चाळीतच कांदा साठवतात. हा व्यवहार विश्वासावर चालतो. त्यामुळे भाव कितीही वाढले तरी शेतकरी व्यवहार मोडत नाही. मात्र मोठे असे व्यवहार यावर्षी घडले असण्याची शक्यता कमी आहे नाही. तेजीही अनपेक्षित एकदम झाल्याने शेतकऱ्याकडून व्यापाऱ्यास माल विकण्यापेक्षा गरजेपुरता टप्प्याटप्प्याने विक्री करून तेजीचा फायदा घेणे शक्य होईल.टॅग्स