23 June 11:00

कांदा-लसूण-टोमॅटोच्या कमी-जास्त भावाने केंद्रातील सरकार ठरते


कांदा-लसूण-टोमॅटोच्या कमी-जास्त भावाने केंद्रातील सरकार ठरते

कृषिकिंग, पुणे: इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीनंतर पहिल्यांदाच देशात जनता पार्टीचे गैर-काँग्रेसी सरकार स्थापन झाले होते. पुन्हा केंद्रात सत्तेत येण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या कॉंग्रेसला कोणताही मुद्दा मिळत नव्हता, त्यातच कांद्याचे भाव प्रचंड प्रमाणात वाढले. कॉंग्रेसने या कांदा भाववाढीचा मोठा राजकीय वापर करून घेत, संसदेत कॉंग्रेसच्या अनेक नेते त्यावेळी गळ्यात कांद्यांची माळ घालून आले होते. परिणामस्वरूप, काही दिवसातच जनता पार्टीचे केंद्रातील सरकार पडले होते. अर्थात जनता पार्टीचे सरकार पडण्यास अनेक मुद्दे कारणीभूत होते. मात्र, त्यातला मुख्य मुद्दा हा सरकारला कांदा दराचा सोडवता न आलेला पेच होता.

कांद्यासोबतच डाळी आणि भाजीपाल्याच्या दरांवरूनही भारतातील काही राजकीय पक्षांना सत्ता मिळाली आहे, तर काहींना सत्ता गमवावी लागली आहे. यामध्ये लसूण, टोमॅटो यांसारख्या अन्य पिकांचाही समावेश आहे. या पिकांचे दर कमी-जास्त झाल्यामुळे सामान्य नागरिक आणि शेतकरी त्रस्त झाल्यास त्याचा परिणाम हा त्या-त्या काळातील सरकारांना भोगावा लागला आहे. यातून ना कॉंग्रेस सुटू शकली आहे ना भाजपा..!

१९८० साली जनता पार्टीचे सरकार पडल्यानंतर कॉंग्रेस केंद्रात पुन्हा सत्तेत आले. परंतु, सरकार बनण्याच्या एका वर्षाच्या आतच सामान्य नागरिकांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले होते. आता कांद्याच्या मुद्द्याचा वापर करून घेण्याची वेळ विरोधी पक्षांची होती. विरोधी पक्षांनी रस्त्यांपासून ते संसदेपर्यंत या मुद्द्याच्या पुरेपूर वापर घेतला. म्हणजेच कांद्याने फक्त कॉंग्रेसलाच नाही रडवलं तर ज्याही पार्टीचे सरकार सत्तेत असेल त्या पार्टीला कांद्याच्या कमी-जास्त होणाऱ्या दरांचा परिणाम सहन करावा लागला आहे.

१९९८ साली अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेत होते. आणि दिल्लीत भारताच्या सध्याच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या त्यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्यावेळी कांद्याचे दर हे १०० रुपये प्रति किलोपर्यंत वाढले होते. परिणामस्वरुप, दिल्लीतील जनतेने त्याकाळच्या सत्तेतील सुषमा स्वराज यांच्या भाजपा सरकारला बाहेरचा रस्ता दाखवला होता. यानंतर ठीक १५ वर्षांनी म्हणजेच २०१३ साली दिल्लीतील शीला दीक्षित सरकारच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले होते.

मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा आरोप आहे की, पिकांच्या दरात वाढ झाल्यास सामान्य नागरिक त्रस्त होतात म्हणून संसदेपर्यंत हंगामा होतो. मात्र, पिकांना योग्य तो दर न मिळाल्यास शेतकऱ्यांचा कणाच मोडला जातो. त्यामुळे गेल्या २०१३ पासून अनेकदा शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. २०१३ नंतर २०१५ मध्ये कांद्याचे दर हे १०० रुपये प्रति किलो, तर लसणाचे दर २०० रुपयेपर्यंत पोहचले होते. परंतु, २०१८ मध्ये मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक भागांत कांदा ५० पैसे किलो तर लसून १-२ रुपये प्रति किलो पर्यंत खाली आला आहे.

मागील वर्षी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील शेतकरी हे रस्त्यावर उतरले होते. त्याचे मुख्य कारण हे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना न मिळणारा योग्य तो बाजारभाव. २०१७ मध्ये मध्यप्रदेशातील ज्या मंदसौर जिल्ह्यातील ६ शेतकऱ्यांना गोळी लागून, त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच मंदसौरमध्ये आज अनेक घरांमध्ये लसणाच्या गोण्या भरून पडल्या आहेत. कारण घाऊक बाजारात १० रुपये ते ५० रुपये प्रति किलो विकला जाणारा लसून सध्या २ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. कांदा आणि लसणाच्या दराचा ताळमेळ संभाळत मागील १४ वर्षांपासून मध्यप्रदेशात भाजपाची सत्ता टिकवून ठेवणाऱ्या शिवराज सिंह चौहान सरकारच्या विरोधात कॉंग्रेस आयताच मुद्दा मिळाला आहे.

पहिले काही वर्षांपूर्वी असे होत होते की, कोणत्याही वस्तूचे दर वाढले वर्षातून एकदाच वाढत होते. मात्र, आजकाल कधी कांदा १०० रुपये प्रति किलो विकला जातो तर कधी २ रुपये प्रति किलो दरानेही कोणी खरेदी करत नाही. यातील सर्वात मोठी समस्या ही आहे की, भाववाढ झाली तरी त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होत नाही. कारण सरकारचे धोरण हे नेहमीच ग्राहकांच्या दृष्टीने राहिले आहे. त्यांनी कांदे खाणाऱ्यांचा विचार करून, भाववाढ झाल्यास, पाकिस्थानातून कांदा मागवला. मात्र, याउलट शेतकऱ्यांकडे कांद्याची आवक वाढल्यास तोच कांदा बाहेर पाठवण्यासाठी कोणतीही योजना बनवली जात नाही. आता शेतकरी गावबंदी नाहीतर मतबंदी करतील. १ जून ते १० जून याकाळात मध्यप्रदेशसह देशातील प्रमुख ७ राज्यांतील शेतकऱ्यांनी गाव बंद संप केला. गेल्या अनेक वर्षांपासून कांदा व लसूण उत्पादक शेतकरी योग्य दर मिळत नसल्याने चिंतेत आहे. त्यामुळे हीच परिस्थिती कायम राहिली तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये शेतकरी गावबंदी ऐवजी मतबंदी करतील हे नक्की..!