18 July 13:05

कांदा, हरभरा, सोया पेंड, डेअरी उत्पादनांच्या निर्यातीवर केंद्राकडून ५ ते १० टक्क्यांपर्यंत सवलत


कांदा, हरभरा, सोया पेंड, डेअरी उत्पादनांच्या निर्यातीवर केंद्राकडून ५ ते १० टक्क्यांपर्यंत सवलत

कृषिकिंग, नवी दिल्ली: कांदा, हरभरा, सोया पेंड आणि डेअरी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्या निर्यातीसाठी ५ ते १० टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, कांदा निर्यातीसाठी ५ टक्के सवलत देण्यात आली आहे. तर स्किम्ड दूध, लहान मुलांचे दूध, होल मिल्क, दही या डेअरी उत्पादनांच्या निर्यातीसाठी १० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय सोया पेंडच्या निर्यातीवर ७ टक्क्यावरून १० टक्क्यांपर्यंत सवलत वाढवण्यात आली आहे. तर हरभरा निर्यातीवरील सवलत सीमा ३ महिन्यांनी वाढवून, ती आता २० सप्टेंबर २०१८ करण्यात आली आहे.

"केंद्र सरकारकडून सोया पेंडच्या निर्यातीवर ७ टक्क्यावरून १० टक्क्यांपर्यंत सवलत वाढवण्यात आल्याच्या निर्णयामुळे निर्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोया पेंडची किंमत कमी असल्यामुळे आतापर्यंत एकूण निर्यात कमी झाल्याचे दिसून आले आहे." असे सोयाबीन प्रोसेसर्स एसोसिएशन आॅफ इंडियाचे (सोपा) अध्यक्ष डेविश जैन यांनी सांगितले आहे. दरम्यान सोपाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चालू वर्षात ऑक्टोबर २०१७ ते जून २०१८ या काळात १३.६१ लाख टन सोया पेंडची निर्यात झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत १६.३४ लाख टन इतकी नोंदवली गेली होती.

याशिवाय कांद्याच्या निर्यात सवलतीत वाढ करण्यात आल्यामुळे एकूण निर्यातीत वाढ होण्यास मदत होणार आहे. राष्ट्रीय फळबाग संशोधन आणि विकास प्रतिष्ठानच्या (एनएचआरडीएफ) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात (२०१७-१८) कांद्याच्या निर्यातीत घट होऊन ती २१.३५ लाख टन इतकी नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत ३४.९२ लाख टन इतकी नोंदवली गेली होती.