26 December 10:45

कांदाप्रश्नी सदाभाऊ खोत केंद्रीय कृषिमंत्र्यांना भेटणार


कांदाप्रश्नी सदाभाऊ खोत केंद्रीय कृषिमंत्र्यांना भेटणार

कृषिकिंग, नाशिक: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य सरकारने २०० रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. त्यात अधिक सुधारणा करतानाच, केंद्राकडे निर्यात अनुदान ५ टक्‍क्‍यांवरून १० टक्के करावे आणि आगामी तीन महिन्यांसाठी ते १५ टक्के करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. त्यासाठी बाजार समितीचे पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांसह महाराष्ट्र शासनाचे संयुक्त शिष्ठमंडळ लवकरच केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेऊन ठोस उपाययोजना करण्यासाठी जाणार आहे. असे राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे.

नवीन लाल कांदा विक्रीसाठी येत असतानाच नाशिकमधील जवळपास १५ लाख क्विंटल उन्हाळ कांदा विक्री न झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याचअनुषंगाने कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीसंदर्भात नाशिकच्या विश्रामगृहावर राज्याचे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीचे सभापती, सचिव आणि कांदा व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.

या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्याचा सातबारा कोणाच्याही नावे असला तरी कुटूंबातील शेतकरी, त्याची पत्नी, मुलगी, मुलगा, बहिण यांना अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी अध्यादेशात सुधारणा तात्काळ केली जाईल. निर्यात अनुदान ५ टक्‍क्‍यांवरून १० टक्के आणि येत्या तीन महिन्यांसाठी ते १५ टक्के करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे देणार. त्यामुळे कांद्याची दरवाढ होऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार. त्यादृष्टीने कांद्याचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्यासाठी लवकरात लवकर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती पदाधिकारी, कांदा व्यापारी यांचे संयुक्त शिष्टमंडळ केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेणार. तसेच १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान उन्हाळ कांद्याला देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या मुदतीमध्ये महिनाभराची वाढ केली जाईल. असेही त्यांनी सांगितले आहे.टॅग्स