14 December 11:58

कांदाप्रश्नी शिष्टमंडळाची केंद्रीय कृषिमंत्र्यांशी भेट; प्रति क्विंटल हजार रुपये अनुदानाची मागणी


कांदाप्रश्नी शिष्टमंडळाची केंद्रीय कृषिमंत्र्यांशी भेट; प्रति क्विंटल हजार रुपये अनुदानाची मागणी

कृषिकिंग, नवी दिल्ली: "कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळण्यासाठी शासनाने कांदा उत्पादकांना एक हजार रुपये प्रती क्विंटल अनुदान द्यावे अथवा बाजार हस्तक्षेप योजना राबवावी," अशी मागणी नाशिक लासलगाव व चांदवड बाजार समितीच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याकडे केली आहे. त्यावर कृषिमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

या शिष्टमंडळात केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार हरीश्चंद्र चव्हाण, आमदार अनिल कदम, डॉ.आत्माराम कुंभार्डे (सभापती कु.उ.बा.स.चांदवड), डॉ.नितीन गांगुर्डे, कु.उ.बा.संचालक विलास ढोमसे यावेळी उपस्थित होते.

सध्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये रब्बी (उन्हाळ) कांद्याबरोबर खरीप (लाल) कांद्याची विक्री होत असून उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांद्यालाही मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. जुलैत लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांदा कमीत कमी ४०० रुपये तर जास्तीत जास्त १५५२ रुपये आणि सर्वसाधारण ११५१ रुपये प्रति क्विंटलने विकला गेला. मात्र, आता उन्हाळ कांदा कमीत कमी २०१ रुपये, जास्तीत जास्त ६९० रुपये आणि सर्वसाधारण ३७० रुपये प्रति क्विंटलने विकला जात आहे. कांद्यास मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी पूर्णत: हतबल झाला असून, केंद्र सरकारने यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.टॅग्स