20 December 12:42

कांदाप्रश्नी राज्य-राष्ट्रीय नेत्यांनी वळवला नाशिककडे मोर्चा


कांदाप्रश्नी राज्य-राष्ट्रीय नेत्यांनी वळवला नाशिककडे मोर्चा

कृषिकिंग, नाशिक: गडगडणाऱ्या कांद्याच्या भावामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांमध्ये सध्या असंतोष धुमसत आहे. कांदा विकून आलेली तुटपुंजी रक्कम शेतकऱ्याने थेट पंतप्रधानांना मनीऑर्डर केल्याने सुरू झालेली राष्ट्रीय चर्चा. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील स्थानिक राजकीय नेत्यांसोबत आता राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनीही नाशिककडे त्यांचा मोर्चा वळवला आहे. सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन आधार देत आहे.

याशिवाय नोव्हेंबरमध्ये दिल्लीत झालेल्या किसान मुक्ती मोर्चाचे संयोजक, स्वराज इंडियाचे संस्थापक आणि अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे सदस्य योगेंद्र यादव यांच्यासह प्रहार संघटनेेचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू हे दोघे येत्या आठवड्यात कांदाप्रश्नी नाशिकमध्ये येणार आहेत.

शेतकरी नेते योगेंद्र यादव येत्या २१ डिसेंबरला नाशिकमध्ये येत असून पिंपळगाव बाजार समितीच्या नवीन मार्केटमध्ये कांदा उत्पादकांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील २६ डिसेंबरला नाशिकमध्ये कांदा आंदोलन जाहीर केले आहे. कडू चांदवडला मुक्काम मोर्चा काढणार आहेत. त्यांच्या आंदोलनांच्या आक्रमक शैलीमुळे प्रशासनापुढेही आव्हान उभे केले आहे. कांद्याच्या कोसळणाऱ्या किमतींमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीसाठी कडू हे आंदोलन करत आहेत.