04 August 12:44

कांदाचाळ उभारणीसाठी ५० कोटीच्या अनुदान प्रकल्पास मान्यता


कांदाचाळ उभारणीसाठी ५० कोटीच्या अनुदान प्रकल्पास मान्यता

कृषिकिंग, मुंबई: कांदाचाळ उभारणीसाठी राज्यातील शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, वर्ष २०१७-१८ मध्ये राष्ट्रीय कृषी चिकास योजनेअंतर्गत कांदाचाळ उभारणीकरीता ५० कोटी रुपये रकमेच्या प्रकल्पाला महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

कांदाचाळ उभारणी प्रकल्प महाराष्ट्र राज्य एकात्मिक फलोउत्पादन विकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर लॉटरी पद्धतीने त्यांची निवड करण्यात येणार असून जिल्हा-तालुकानिहाय निधीचे वाटप केले जाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, आणि मस्त्यव्यवसाय विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

तसेच, शेतकऱ्यांना याप्रकल्पाअंतर्गत कांदाचाळ उभारणीकरीता पूर्वसंमती घेणे गरजेचे असून, त्यानंतर कांदा चाळीची प्रशासकीय पातळीवर रीतसर तपासणी झाल्यानंतर अनुदानाची रक्कम संबंधित लाभार्थी शेतकऱ्याच्या आधार संलग्नित बँक खात्यावर जमा करण्यात येईल. असेही या परिपत्रकात सांगितले आहे.

तर, ज्या शेतकऱ्यांनी याप्रकल्पाअंतर्गत कांदाचाळ उभारणीकरीता पूर्वसंमती घेतली नसेल, त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नसल्याचा स्पष्ट उल्लेख या परिपत्रकात करण्यात आला आहे.