13 November 10:45

कांदा निर्यातीत ५६ टक्क्यांनी वाढ; तरीही आयात


कांदा निर्यातीत ५६ टक्क्यांनी वाढ; तरीही आयात

कृषिकिंग, नवी दिल्ली: देशातून यंदा एप्रिल-जुलैदरम्यान कांदा निर्यातीत ५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरीही सध्या देशांतर्गत बाजारात कांद्याचे किरकोळ दर वाढले असल्याचे कारण देत केंद्राकडून कांदा आयात केली जात आहे.

“देशातून यंदा एप्रिल-जुलै दरम्यान १२.२९ लाख टन कांदा निर्यात करण्यात आला आहे. ही निर्यात मूल्यात १ हजार ४४३ कोटी एवढी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ९७७.८४ कोटी रुपयांचा कांदा निर्यात करण्यात आला होता. यंदा निर्यात झालेल्या कांद्याचे मूल्य ४७.६९ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ७.८८ लाख टन कांदा निर्यात झाला होता. यंदा कांदा निर्यातीत झालेली वाढ ५६ टक्क्यांनी अधिक आहे.” अशी आकडेवारी सांख्यिकी महासंचालनालयाकडून देण्यात आली आहे.

देशातील विविध भागांत कांद्याचे दर वाढले आहे. या पार्श्वभूमीवर कांद्याचे दर नियंत्रणात राहावेत, उपलब्धतता वाढावी, यासाठी गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने एमएमटीसी या सरकारी एजन्सीमार्फत इजिप्त, चीनमधून कांदा आयातीसाठी परवानगी दिली आहे.

“कांद्यावर किमान निर्यात मूल्य (एमईपी) नाही. तसेच जागतिक बाजारपेठेत कांद्याचे दर वाढले आहेत. या दोन कारणांमुळे भारतातून होणाऱ्या कांदा निर्यातीत वाढ झाली आहे,” अशी माहिती राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास प्रतिष्ठानचे (एनएचआरडीएफ) उपसंचालक पी. के. गुप्ता यांनी दिली आहे.

पहिल्या तिमाहीत कांद्याचे दर घसरले होते. मात्र निर्यातीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळाला. सध्या कांद्याच्या साठ्यात घट झाल्याने देशांतर्गत बाजारात दर वाढले आहेत. यामुळे निर्यात काहीशी मंदावली आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. सध्या जुना कांदा संपला असून नवीन कांद्याची आवक कमी आहे, यामुळे कांद्याचे किरकोळ दर वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धतता राहावी, यासाठी आता केंद्र सरकारने एमएमटीसी या सरकारी एजन्सीला आणि खासगी व्यापाऱ्यांना कांदा आयात करण्यास मुभा दिली. यामुळे आतापर्यंत देशांतर्गत बाजारात ११,४०० टन आयात कांदा पोचला आहे.टॅग्स