09 April 10:55

कांदा निर्यात २५ टक्क्यांनी घटली; दरात घसरणीची शक्यता


कांदा निर्यात २५ टक्क्यांनी घटली; दरात घसरणीची शक्यता

कृषिकिंग, लासलगाव(नाशिक): दर घसरणीचा सामना करत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात अजून नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कारण, कांदा निर्यातीत मोठी घट झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा वाढणार आहे. आणि त्यामुळे कांद्याच्या दरात अजूनच घसरण होऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.

सरकारी आकडेवारीनुसार, मार्च मध्ये संपलेल्या २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या दरम्यान देशातील एकूण कांदा निर्यातीत २५ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण नोंदवली गेली आहे. या कालावधीमध्ये देशातून फक्त २०.३४ लाख टन इतक्या कांद्याची निर्यात होऊ शकलेली आहे. तर आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये या कालावधीत २७.२० लाख टन कांद्याची निर्यात झाली होती.

दरम्यान, यावर्षी कांद्याचे उत्पादन हे मागील वर्षीच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी देशात एकूण २१४.०२ लाख टन इतके कांद्याचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी २२४.२७ लाख टन इतके नोंदवले गेले होते.

कांद्याच्या दराचा विचार केला असता, देशातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव सध्या मागील ८ महिन्याच्या निच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. मागील आठवड्याच्या शेवटी अर्थात शनिवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सरासरी ६८० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. जो जुलै २०१७ नंतरचा सर्वात कमी दर आहे.टॅग्स