28 July 17:55

कांदा दरात २५० रुपयांनी वाढ, कृषिकिंगचा अंदाज खरा ठरतोय


कांदा दरात २५० रुपयांनी वाढ, कृषिकिंगचा अंदाज खरा ठरतोय

कृषिकिंग, पुणे: टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरात सरासरी प्रतिक्विंटल २५० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे बाजारात कांद्याचा दर १४ ते १५ रुपये किलो झाला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढली आहे.

वर्षभरापासून दोलायमान अवस्थेत राहिलेल्या कांद्याचा एक हजार रुपयांचा टप्पा गाठण्यासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळतो; पण गेल्यावर्षी राज्यात विक्रमी कांद्याचे उत्पादन झाले होते. त्यामुळे भाव कोसळले होते. तेव्हापासून कांद्याची घाऊक बाजारपेठ अनिश्चिचततेच्या भोवऱ्यात अडकली होती. मागील हंगामात कांद्याला जेमतेम दर मिळत होता. यावर्षी उन्हाळी कांद्याची आवक साधारपणे मे पासून सुरू झाली. यासाठी प्रति क्विंटलचे भाव पाचशे ते साडे पाचशे रुपये होता. महाराष्ट्रापाठोपाठ मध्यप्रदेशात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मागील वर्षी दर कोसळल्याचा परिणाम उत्पादनावर होऊन मध्यप्रदेशात उन्हाळी कांद्याचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे मध्यप्रदेशातील कांदा लवकर संपला. आता केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत कांदा सामान्य ग्राहकांच्या डोळ्याला पाणी आणण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात २१ जुलैपर्यंत दर दिवशी साडे चार ते पाच हजार क्विंटल कांद्याची आवक होत होती. या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ६०० रुपयांच्या जवळपास दर मिळत होता; पण गेल्या दोन दिवसांत कांदा आवक घटली आहे. बुधवारी व गुरुवारी कांद्याच्या आवकेत ८० टक्के घट झाली आहे. गुरुवारी २ हजार ९०० किंवटल आवक झाली. या कांद्यासाठी प्रतिक्विंटल ४०० रुपये ते १३०० रुपये असा दर झाला आहे. सरासरी १ हजारापर्यंत दर झाला आहे. यामुळे किरकोळ विक्रीसाठी याच कांद्याचा दर १३ ते १५ रुपये झाला आहे.

कांद्याला मे आणि जून महिन्यात मागणी असते. पावसाळा सुरू झाल्यानंतर कांद्याची मागणी कमी होते. तसेच पावसाळी हवामानाचा त्या कांद्यावर परिणाम होऊ नये, यासाठी शेतकरी वखारीत कांदा ठेवत असतात. यामुळे कांद्याचे दर तेजीत राहतात. यावर्षी मध्यप्रदेशातही कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून देशातील इतर राज्यांत कांद्याची मागणी होऊ लागल्याने दर वाढत आहेत. कृषिकिंग ने जुलै महिन्याच्या सुरवातीलाच आपल्या रिपोर्टमध्ये कांदा दरातील घसरण थांबली असून आता टप्याटप्याने मर्यादित तेजी येईल असा अंदाज दिलेला होता.टॅग्स