23 January 10:56

कांदा दरात सुधारणा नाहीच; शेतकरी मेटाकुटीला


कांदा दरात सुधारणा नाहीच; शेतकरी मेटाकुटीला

कृषिकिंग, नाशिक: साठवून ठेवलेला उन्हाळ व नवीन लाल कांदा बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहे. उन्हाळा कांद्याला सध्या १ ते २ रुपये प्रति इतका कवडीमोल दर मिळत आहे. तर नवीन चांगल्या प्रतीच्या कांद्याचा दर ८ ते ९ किलो रुपयांच्या पुढे जात नाहीत. आवक वाढत असल्याने कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आला आहे.

सरकारकडून देण्यात येणाऱ्या तुटपुंज्या अनुदानावर शेतकऱ्यांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. उन्हाळी कांद्याची आवक अजून टिकून आहे. मात्र देशांतर्गत बाजारपेठेत स्थानिक कांदा दाखल झाल्याने बाजारभावात घसरण सुरूच आहे. कांद्याचे बी-बियाणे, खते, औषधे व वाहतूक खर्चात वाढ झालेली आहे. मात्र, उत्पादित कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने कांदा उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडवले आहे.

कांदापिकाबाबतचे धरसोडीच्या धोरणामुळे कांद्याच्या एकूण निर्यातीवर परिणाम झाला आहे. कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय येथील शेतकऱ्यांसाठी फारसा फायद्याचा ठरणार नसल्याचे दिसत आहे. कारण हे अनुदान केवळ ३१ डिसेंबरपर्यंत बाजार समितीत कांदा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

भावात झालेल्या घसरणीमुळे केंद्राने कांद्याच्या निर्यात अनुदानात दुप्पटीने वाढ केली आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या उच्च प्रतीच्या नवीन कांद्याला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही.टॅग्स