30 January 12:49

कांदा दरात घसरण; निर्यात मूल्य हटवण्याची मागणी


कांदा दरात घसरण; निर्यात मूल्य हटवण्याची मागणी

कृषिकिंग, लासलगाव(नाशिक): कांद्याचे किमान निर्यात मूल्य ८५० डॉलरवरून ७०० डॉलर केल्यानंतरही निर्यातीमध्ये न झालेली वाढ, राज्यातील तसेच परराज्यातील बाजारपेठांमध्ये आवक वाढल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी क्विंटलमागे सरासरी दरामध्ये ९०० रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे दर जास्तीत जास्त ३५०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. जे सध्या किमान १८०० ते कमाल २५०० तर सरासरी २००० रुपयांपर्यंत खाली आले आहे.

केंद्र सरकारने मागील आठवड्यामध्येच कांद्याच्या किमान निर्यात मूल्यामध्ये कपात केली होती. बहुतेक कांदा निर्यातदार स्पर्धक देशांमध्ये किमान निर्यात मूल्य २०० ते ४०० डॉलर आहे. भारतीय कांद्यावर मात्र ते दुपटीने असल्याने त्याचा थेट कांदा व्यापारावर होत असून, निर्यातीत अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कांद्यावरील निर्यात मूल्य संपूर्णपणे हटवण्याची मागणी केली जात आहे.

सध्या श्रीलंका वगळता इतर देशांमध्ये भारतीय कांदा निर्यात थंडावलेली आहे. तसेच लाल कांद्याबरोबरच रांगडा कांद्याची नेहमीपेक्षा सुमारे तिप्पट आवक होत आहे. गुजरातसह मध्य प्रदेश व इतर राज्यांत होत असलेली कांदा आवक याचा संयुक्त परिणाम लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये जाणवत आहे. कांदा भावात वेगाने घसरण होत असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे. या आठवड्यात गुजरात बरोबरच मध्यप्रदेशसह इतर राज्यांत नवीन कांदा बाजारपेठेत दाखल झाल्याने महाराष्ट्रातील कांद्याची मागणी कमी झाली. त्यामुळे सोमवारपासून कांद्याच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.टॅग्स