31 July 11:24

कांदा दर वाढते राहण्याचे संकेत


कांदा दर वाढते राहण्याचे संकेत

कृषिकिंग, अहमदनगर: गुजरात, राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेशसारख्या मोठ्या राज्यांत असलेल्या अत्यल्प कांदा साठ्याच्या पार्श्वभूमीवर आणि यंदाच्या हंगामातील नव्याने येणाऱ्या कांद्यालाही अजून बराच कालावधी असल्याने महाराष्ट्रातील कांदा साठवणूक केलेल्या उत्पादकांना सोन्याचे दिवस येण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात कांदा दर चढे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मध्यंतरीच्या काळात मध्यप्रदेशात कांद्याचे अतिरिक्त पीक झाल्यानंतर तेथील राज्य सरकारने स्थानिक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी किलोला आठ रुपये दराने खरेदी करून त्याची दिल्लीसह देशातील इतर ठिकाणी विक्री केली होती. त्या काळात महाराष्ट्रातील कांद्याला मात्र तीन ते चार रुपयांपर्यंत दर मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. अशा स्थितीत अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा बाजारात नेण्याऐवजी चाळीत साठवणूक करण्यास प्राधान्य दिले. मात्र, त्यांच्या या कांद्याला आता सोन्याचा भाव मिळण्याची चिन्हे आहेत.

एकेकाळी देशात कांदा उत्पादनात महाराष्ट्राची मक्तेदारी होती. नाशिक व नगर जिल्ह्यात कांदा खरेदीसाठी देशभरातील कांदा व्यापारी ठाण मांडून असत. अलीकडच्या काही वर्षांत कर्नाटक, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यातील शेतकऱ्यांनीही कांदा पीक घेण्यास सुरुवात केली. या राज्यांतून कांद्याचे मुबलक पीक बाजारात आल्याने कांदा पिकाबाबतची महाराष्ट्राची ‘कांदा उत्पादक राज्य’ ही ओळख कमी झाली.

मात्र, मागील आठवड्यात राजस्थान व गुजरातमध्ये प्रचंड पाऊस झाल्याने तेथे नव्याने येणारा कांदा खराब झाला आहे. राजस्थानमधील अलवर भागातील कांदा तर जवळपास संपल्यात जमा आहे. तसेच पश्चिम बंगालमधील सुखसागर व कर्नाटक राज्यातील हुबळी, बेळगावसह परिसरातील कांदा बाजारात येण्यास किमान महिना लागणार आहे. दिल्लीसह इतर देशांतर्गत मोठ्या कांदा बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक कमी झाली आहे. कमी आवक व नवा कांदा बाजारात येण्यास लागणारा उशीर यामुळे मागील आठवड्यापासून कांद्याची मागणी वाढून दरातही वाढ झाल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात येते.

आगामी काळात कांद्याच्या दरात फारशी घसरण होण्याची चिन्हे नाहीत. नवा कांदा बाजारात येईपर्यंत जुन्या व उपलब्ध कांद्याच्या दरात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. शेतकऱ्यांनी बाजाराची परिस्थिती पाहूनच कांदा विक्रीसाठी आणावा.
-अनिल म्हेत्रे, कांदा व्यापारी

कांद्याला जास्त दर देण्याचे आमिष दाखवून काही परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उधारीवर कांदा खरेदी केली जाते. अशा व्यवहारांमध्ये अनेक शेतकऱ्यांचे पैसे बुडवले गेल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमध्येच कांदा विक्रीसाठी आणावा.
-प्रशांत गायकवाड, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेरटॅग्स