26 October 10:59

कांदा खरेदी करू नका! अधिकाऱ्यांची व्यापाऱ्यांना सक्त ताकीद


कांदा खरेदी करू नका! अधिकाऱ्यांची व्यापाऱ्यांना सक्त ताकीद

कृषिकिंग, नाशिक: “ग्राहकांना जास्त दराने कांदा खरेदी करावा लागतो आहे. त्यामुळे जर कांदा खरेदी कराल तर तुमच्या मागे ‘ईडी’ची चौकशी लावू. आम्ही कांदा आयात करू” अशा स्पष्ट शब्दांत केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कांदा व्यापाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली असल्याच्या माहितीने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर बाजार समित्या सुरु होताच कांद्याने सोमवारी तीन हजाराचा टप्पा ओलांडला होता. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने नाशिक व पुणे भागातील काही व्यापाऱ्यांना दिल्लीत बोलावून, कांदा खरेदी न करण्याबाबत ताकीद दिल्याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.

व्यापाऱ्यांना धमकावण्यात आल्यानंतर लासलगाव, पिंपळगाव बसवंत, पुणे या बाजार समित्यांमधील कांदा व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे. परिणामी, सोमवारी तीन हजाराचा टप्पा ओलांडणारा कांदा मंगळवारी आणि बुधवारी ३०० ते ७०० रुपयांनी खाली घसरला आहे. कमाल ४००० रुपये आणि सरासरी ३५०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत वधारलेला कांदा कमाल २८०० रुपये आणि सरासरी २४०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली येऊन स्थिरावला आहे.

मागील दोन-तीन वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकरी गारपीठ आणि योग्य तो भाव न मिळाल्यामुळे तोट्यात आहे. त्यावेळी कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपयांचा दर मिळत असताना सरकारने ढुंकूनही पाहिले नाही. आणि आता चांगला भाव मिळत असताना कांद्याची दरवाढ होऊ नये, म्हणून सरकारकडून व्यापाऱ्यांवर वारंवार दबाव टाकण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे कांद्याचा दर पाडण्याचा प्रयत्न करून सरकार शेतकऱ्यांचा रोष ओढावून घेत आहे, हे मात्र नक्की.

यापूर्वीही सरकारकडून कांदा व्यापाऱ्यांवर वारंवार दबाब टाकला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर कृषिकिंगने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यासंदर्भात अधिक वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. https://www.krushiking.com/newsdetail.php?goytrarenyarjf&100102902टॅग्स