16 January 11:00

कांदा अनुदानासाठी राज्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांचे अर्ज


कांदा अनुदानासाठी राज्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांचे अर्ज

कृषिकिंग, पुणे: कांद्याचे दर पडल्याने अडचणीत सापडल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुदान देण्यासाठीचे अर्ज स्वीकारले जात आहे. आतापर्यंत राज्यातील तब्बल सव्वा लाख शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे अर्ज केले आहेत. तसेच अनुदानासाठी अर्ज करण्यास येत्या २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे राज्याचे पणन संचालक दिपक तावरे यांनी सांगितले आहे.

राज्य शासनातर्फे १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व काही खासगी बाजार समितीमध्ये कांद्यांची विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबतचा अध्यादेश काढला. त्यानुसार पणन संचालक कार्यालयातर्फे अनुदान वितरणासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली. राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वंतत्र कक्ष सुरू करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना अनुदानासाठीचे अर्ज मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शासनातर्फे शेतकऱ्यांना २०० क्विंटल मर्यादेपर्यंत प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अनुदानासाठी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच अनुदान अर्ज करण्यास १५ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. परंतु, शेतकऱ्यांना अर्जासोबत जोडावे लागणारे आवश्यक कागदपत्र मिळविण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे पणन संचालक कार्यालयातर्फे २५ जानेवारीपर्यंत मुदत वाढविली आहे.

राज्यातील सुमारे १ लाख २५ हजार शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केले आहेत. त्यातील सुमारे ५० हजार अर्ज नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमधील आहेत. पुणे जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सुमारे १५ ते २० हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. तर उर्वरित जिल्ह्यात ५ ते १० हजार शेतक-यांनी अर्ज केले आहेत. अशी माहितीही दीपक तावरे यांनी यावेळी दिली आहे.टॅग्स