24 July 10:20

कर्जमाफी: घोटाळे रोखण्यास राज्य सरकार सज्ज- मुख्यमंत्री


कर्जमाफी: घोटाळे रोखण्यास राज्य सरकार सज्ज- मुख्यमंत्री

कृषिकिंग, मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आता ऑनलाइन अर्ज भरावा लागणार असून आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून त्यासाठी राज्यभरात पंचवीस हजार केंद्रे सुरू केली जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान एक केंद्र सुरू केले जाईल. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठीचा हा अर्ज अतिशय सोपा असून यात शेतकऱ्यांना आपला बॅंक खाते क्रमांक, आधार क्रमांक, कुटुंबात अज्ञान मुले असतील तर त्यांचे बॅंक खाते क्रमांक आणि कर्जमाफीतून वगळलेल्या प्रवर्गात नसल्याचे प्रतिज्ञापत्र शेतकऱ्यांकडून भरून घेतले जाणार आहे. अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना महिन्याभराचा वेळ देण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी लवकर अर्ज भरल्यास १० ते १२ दिवसांत ही प्रक्रिया पू्र्ण होईल.”

सर्व शेतकऱ्यांना आधारशी लिंक केल्यामुळे मागील कर्जमाफीत जे बोगस प्रकार झाले ते होणार नाहीत. आधार नसलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब आधार कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने छाननी गतीने करता येणार आहे. तसेच, कर्जमाफीची रक्कम उपलब्ध करुन देण्यासाठी पूरवणी मागण्यांचा प्रस्ताव आजपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.