13 June 10:41

कर्जमाफीसाठी एकरमर्यादा नाही


कर्जमाफीसाठी एकरमर्यादा नाही

कृषिकिंग, मुंबई: ‘राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा तत्वतः निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ सर्वच स्तरातील शेतकऱ्यांना मिळेल असा सरकारचा मानस आहे. अमुक एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ ‌असा निकष नसून, शेतकऱ्याकडे कितीही एकर जमीन असली तरी त्याला कर्जमाफी मिळेल’, असे महसूलमंत्री व या प्रश्नी नेमलेल्या उच्चाधिकार मंत्रीगटाचे प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

कर्जमाफीसाठी राज्यात शेतकरी आंदोलन पेटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरुवातीला अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवणाऱ्या सुकाणू समितीने संपूर्ण कर्जमाफीची मागणी कायम ठेवली होती. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही संपूर्ण कर्जमाफीची मागणी लावून धरली होती. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सरकारतर्फे सरसकट कर्जमाफी देण्याचे मान्य करण्यात आले. त्याविषयी अधिक स्पष्टता करताना चंद्रकांत पाटील यांनी ‘एकरमर्यादा’ हा कर्जमाफीचा निकष नसेल, असे सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्याकडे जमीनधारणा कमी असते. विदर्भ व मराठवाड्यात शेतकऱ्यांकडे जास्त जमीन असली तरी त्यांचे उत्पन्न कमी असते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सरकारने कर्जमाफीच्या लाभासाठी एकराची मर्यादा न ठेवण्याचा निर्णय तत्वतः घेतला आहे, असे पाटील म्हणाले.