09 February 10:32

कर्जमाफी दिलेल्या खात्यांवर व्याज आकारणी करू नका- मुख्यमंत्री


कर्जमाफी दिलेल्या खात्यांवर व्याज आकारणी करू नका- मुख्यमंत्री

कृषिकिंग, मुंबई:”शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेंतर्गत मंजुर कर्जखात्यांवर बँकानी ३१ जुलै २०१७ नंतर व्याज आकारणी करू नये.” असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व बँकांना दिले आहेत. एकरकमी परतफेड योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँकांनी विशेष मोहीम राबवून शेतकऱ्यांना थकबाकीची उर्वरित रक्कम भरण्यास प्रोत्साहित करावे, तसेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे काम १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावेत. असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत. कर्जमाफी याेजनेच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत.

यापूर्वी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत व्याज न आकारण्याबाबत निर्णय झाला आहे. तरीदेखील ३१ जुलै २०१७ नंतर कर्ज खात्यांवर काही बँका व्याज आकारणी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बँकानी अशी व्याज आकारणी करू नये व असे केल्यास बँकावर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तर कर्जमाफी योजनेंतर्गत एकूण ३१.३२ लाख कर्ज खात्यांवर १२ हजार तीनशे कोटी एवढी रक्कम संबंधित कर्जखात्यांत वर्ग करण्यात आली आहे. तथापि शेतकऱ्यांनी अर्जात दिलेली माहिती व बँकेकडील माहिती जुळत नसल्याने अशा शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती संबंधित बँकांकडे पाठविण्यात आली आहे. २१.६५ लाख खात्यापैकी १३.३५ लाख खात्यांची माहिती बँकानी अपलोड केली आहे .उर्वरित कर्जखात्यांची माहिती पुढील तीन दिवसात सर्व जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका, व्यावसायिक बँकानी पोर्टलवर टाकावी. उर्वरित टप्प्यातील रक्कम पात्र खातेदारांच्या कर्जखात्यावर जमा होण्यासाठी बँक व तालुकास्तरीय समित्यांनी जलद गतीने व अचूक काम करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.