27 June 10:15

कर्ज भरणाऱ्यांनाही हवे दीड लाखांपर्यंत अनुदान


कर्ज भरणाऱ्यांनाही हवे दीड लाखांपर्यंत अनुदान

कृषिकिंग, मुंबई: राज्य सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार अनुदान जाहीर केले आहे. मात्र अशा शेतकऱ्यांना कमीत कमी २५ टक्के किंवा जास्तीत जास्त दीड लाखांपर्यंत अनुदान मिळावे, अशी मागणी पुणतांब्याच्या (जि. नगर) शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन केली आहे.

सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे गऱ्हाणे घेऊन हे शिष्टमंडळ पवारांच्या भेटीला मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात आले होते. या शिष्टमंडळात पुणतांब्यासह वारी तसेच वैजापूर परिसरातील शेतकऱ्यांचा समावेश होता. अनेक शेतकऱ्यांनी एकत्रितपणे विविध मार्गांनी पैसे उभे करून, दुर्बल शेतकऱ्यांनाही सामावून घेऊन कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने कर्जमाफी केल्यानंतर अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या भावनाही समजून घेणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे रदबदली करावी, अशी अपेक्षा या शिष्टमंडळाने व्यक्त केली.