01 August 10:20

औत ओढणाऱ्या बैलालाच चाबकाचे फटके खावे लागतात; राजू शेट्टींची टीका


औत ओढणाऱ्या बैलालाच चाबकाचे फटके खावे लागतात; राजू शेट्टींची टीका

कृषिकिंग, पुणे: ‘शरद पवार देशाचे कृषिमंत्री होते म्हणून त्यांच्या विरोधात रान उठवत होतो. मग लोक म्हणतील आता मोदींच्या विरोधात का? कारण आताच्या राधामोहन सिंह यांना माहितीच नाही की ते कृषिमंत्री आहेत म्हणून...सगळे निर्णय मोदीच घेतात. त्यामुळे कृषिमंत्र्यांऐवजी निर्णयाचा अधिकार असणाऱ्या मोदींविरोधात बोलतो. शेवटी औत ओढणाऱ्या बैलालाच चाबकाचे फटके खावे लागतात,’ असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात ते बोलत होते.

शेतकरी हितासाठी मी भांडतो. तेव्हाही माझे व्यक्तिगत भांडण पवारांशी नव्हते व आता मोदींशीही नाही. पवार हे कारखानदारांचे नेते आहेत. शेतकऱ्यांचे नव्हे. राजकारण सांभाळण्यासाठी त्यांनी कारखान्यांच्या संचालकांकडे लक्ष दिले; हे माझे मत मात्र कधीही बदलणार नाही. पूर्वीचे सरकार नाठाळ होते. अंतिम सत्य आपल्यालाच गवसले असल्याच्या थाटात आताचे सरकार वागते. ऐकून घ्यायलाच ते तयार नसतात. स्वतःला भावी मुख्यमंत्री समजून घेणारे चंद्रकांत पाटील यांना कोणत्याही प्रश्नावर मत व्यक्त करावेसे वाटते. दुधाला दर देण्याचा संबंध सरकारशी नसल्याचे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर या वेळचे दूध आंदोलन यशस्वी करणे अधिक अवघड होते. या यशाचे सगळे श्रेय शेतकरी महिलांचे आहे. २५ रुपये दूध दराच्या निर्णयाची नीट अंमलबजावणी सरकारने केली नाही तर गप्प बसणार नाही. राज्यात १६-१७ रुपये दर असताना कोल्हापुरात २३-२५ मिळत होता. राज्यात २५ रुपये मिळणार म्हटल्यावर कोल्हापुरातील दर २७ रुपयांच्या पुढे जाईल, हे मी आताच सांगून ठेवतो, असे भाकीतही त्यांनी यावेळी वर्तवले आहे.