15 December 17:16

ओखी वादळामुळे नाशिक जिल्ह्यातील १ हजार ३६ हेक्टर शेतीला फटका


ओखी वादळामुळे नाशिक जिल्ह्यातील १ हजार ३६ हेक्टर शेतीला फटका

कृषिकिंग, नाशिक: “ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे १ हजार ३६ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले असून, दिंडोरी, निफाड, सटाणा, चांदवड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक फटका बसला आहे. काढणीला आलेल्या निर्यातक्षम द्राक्षांचे अधिक नुकसान झाले आहे.” अशी माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालातून समोर आली आहे. संबधित अहवाल कृषी विभागाकडे मुल्यमापनासाठी पाठविण्यात आला आहे.

या अहवालानुसार प्रामुख्याने कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात फटका बसल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यात पिकांना हा तिसरा फटका बसला असून, यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात अवकाळीने सुमारे ९ हजार क्षेक्टर क्षेत्रवरील पिकांचे नुकसाने झाले होते. ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांवर करपा, डावनीसह वेगवगेळ्य़ा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. दरम्यान, ऑक्टोबरमधील अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे ओखी वादळाच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असला, तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याविषयी साशंकताच व्यक्त केली जात आहे.

द्राक्षांबरोबरच कांदा, मका, टोमॅटो आदी पिकांनाही मोठा फटका बसला आहे. सध्या काढणीला आलेला कांदा पावसाने भिजल्याने खराब झाला आहे. त्यामुळे शेतीमालाचे घसरते भाव आणि त्यातच अवकाळी पावसाने हाताशी आलेला घासही हिरावला गेल्याने शेतकरी पुरता संकटात सापडला आहे.