25 October 09:42

एफआरपीचा एकूण-एक पैसा जमा होईपर्यंत शासन गप्प बसणार नाही- मुख्यमंत्री


एफआरपीचा एकूण-एक पैसा जमा होईपर्यंत शासन गप्प बसणार नाही- मुख्यमंत्री

कृषिकिंग, कोल्हापूर: "उसाच्या एफआरपीचा एकूण एक पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करेपर्यंत शासन गप्प बसणार नाही. याबरोबरच साखरेचा किमान भाव २९ रुपये बांधून दिला असून, तो किमान ३१ रुपये करावा, यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करु," अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारणा कोडोली येथे शेतकरी कष्टकरी परिषदेत दिली आहे.

रयत क्रांती संघटनेच्या वतीने कोल्हापुरातील वारणा कोडोली येथे आयोजित केलेल्या शेतकरी कष्टकरी परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचं असून हे सरकार संवेदनशील आहे. कारण गेल्या चार वर्षात एफआरपीसाठी एकदाही आंदोलन करायला लागले नाही. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात एफआरपीचे पैसे देण्यावर शासनाने भर दिला. राज्याने २१ हजार कोटी एफआरपीचे पैसे दिले, केवळ १२० कोटी बाकी असून तेही प्राधान्यक्रमाने देण्यास शासन बांधिल आहे. असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.

राज्यातील १८० तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील, असेही ते यावेळी म्हणाले आहे.